नेशन न्यूज मराठी टीम.
ठाणे/प्रतिनिधी – येत्या आंबिया बहारामध्ये विविध हवामान धोक्यामुळे आंबा फळपिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी कृषी विभागामार्फत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये सहभागाकरिता विमा पोर्टल सुरु झाले असून कमी किंवा जास्त तापमान, वेगाचा वारा, गारपीट व सापेक्ष आर्द्रता या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत सहभागी होऊन फळबागांचे संरक्षण करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दिपक कुटे यांनी केले आहे.
ठाणे जिल्हयामध्ये अधिसूचित केलेल्या महसूल मंडळात आंबा पिकाच्या उत्पादनक्षम फळबागांना विमा संरक्षण देण्यात येणार आहे. कर्जदार शेतकरी व बिगर कर्जदार शेतकरी यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक असेल. खातेदार शेतकरी व्यतिरिक्त कूळ व भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी यांनाही ही योजना लागू आहे. एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकांसाठी ४ हेक्टर क्षेत्रावर विमा नोंदणी करता येणार आहे. विमा अर्जासोबत फळबागेचा जिओ टॅगिंग (Geo Tagging) असलेला फोटो विमा पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य आहे. एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग व आंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच बहाराकरीता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल, असे श्री. कुटे यांनी कळविले आहे.
ही योजना ठाणे जिल्ह्मामध्ये एचडीएफसी. एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लि. (टोल फ्री नं. १८००२६६०७००) मार्फत राबविण्यात येत आहे. फळपिक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत आंबा पिकाकरिता दि. ३० नोव्हेंबर २०२३ आहे. फळ पिक विमा योजनेंतर्गत हवामान धोक्याचा ट्रिगर कार्यान्वित झाल्यास त्या महसूल मंडळातील त्या पिकासाठी भाग घेतलेल्या शेतकऱ्यास नुकसान भरपाई रक्कम संबंधित विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे.
अवेळी पाऊस, कमी /जास्त तापमान हे धोके उद्भवल्यास आंबा पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 1 लाख 40 हजार रुपये व विमा हप्ता 21 हजार 700 रुपये आहे. गारपीटीने नुकसान झाल्यास विमा संरक्षित रक्कम 46 हजार 667 इतके असून शेतकऱ्यांचा विमा हप्ता 2334 रु. इतके असणार आहे, तसेच अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी किंवा विमा कंपनीशी संपर्क साधावा, असेही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दिपक कुटे यांनी कळविले आहे.
तालुकानिहाय अधिसूचित महसूल मंडळांची यादी :-
आंबा पिकासाठी अंबरनाथ तालुक्यातील अंबरनाथ , बदलापूर, गोरेगाव, कुंभार्ली, कुळगाव ही महसूल मंडळे, कल्याण तालुक्यातील टिटवाळा, नडगाव, भिवंडी तालुक्यातील अनगाव, पडघा, दिघाशी, खारबाव, मुरबाड तालुक्यातील मुरबाड धसई न्याहाडी, देहरी, सरळगाव आणि शहापूर तालुक्यातील शहापूर, किंन्हवली, वाशिंद, डोळखांब खर्डी या महसूल मंडळे अधिसूचित करण्यात आली आहे.