नेशन न्यूज मराठी टीम.
ठाणे/प्रतिनिधी– राज्यभरात दि. 1 ते 7 ऑक्टोबर हा आठवडा वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा होत आहे. ठाणे वनवृत्तांत देखील विविध कार्यक्रम सुरु आहेत. या वन्यजीव सप्ताहादरम्यान गुरुवार, दि.05 ऑक्टोबर 2023 रोजी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पश्चिम मुंबई, यांच्या ठाणे वनवृत्ताच्या दौऱ्यावेळी ठाणे वनवृत्त कार्यालयाच्या सभागृहात वन्यजीवविषयक गुन्ह्यांसंदर्भात आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.
अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पश्चिम मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीस मुख्य वनसंरक्षक (प्रा) ठाणे, उपवनसंरक्षक (प्रा.) ठाणे, उपवनसंरक्षक (वन्यजीव) ठाणे, प्रादेशिक उपसंचालक, वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो मुंबई, विभागीय वन अधिकारी (दक्षता) ठाणे, सहायक वनसंरक्षक, पालघर डहाणू वनविभाग, इतर वन अधिकारी तसेच ठाणे येथे मानद वन्यजीव रक्षक,श्री.अविनाश हरड, श्री. रोहित मोहिते, मानद वन्यजीव रक्षक, मुंबई उपनगर येथे श्री. सुनीश सुब्रमणीयन कुंजू हे उपस्थित होते.
या बैठकीत मुंबई व मुंबई नजीकच्या जिल्हयात होणाऱ्या वन्यजीवांच्या गुन्ह्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पश्चिम मुंबई यांनी सुचविल्याप्रमाणे मुंबई व ठाणे परिसरात घडणाऱ्या वन्यजीव गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच वन्यजीव गुन्ह्यांबाबत समन्वय व सनियंत्रण ठेवण्यासाठी विभागीय वन अधिकारी (दक्षता) ठाणे यांच्या अधिनस्त समिती गठीत करण्याचा तसेच या समितीचे मानद वन्यजीवरक्षक वनविभाग, वन्यजीव शाखेतील वनपरिक्षेत्र अधिकारी, फिरते पथक व इतर अधिकारी सदस्य राहतील, असा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. समितीचे गठन व समितीच्या जबाबदाऱ्या व अधिकाराबाबत मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक आदेश निर्गमित करतील, असे ठरविण्यात आले.
समिती महिन्यातून किमान एक वेळेस बैठक घेवून बैठकीत मुंबई व मुंबई नजीकच्या जिल्ह्यात होणाऱ्या वन्यजीवांच्या गुन्ह्याबाबत आढावा घेईल. तसेच वनविभागामार्फत केलेल्या व करावयाच्या कार्यवाहीबाबत अहवाल सादर करणार आहे. समितीच्या गठनानंतर वन्यजीव गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवणे व वेळेत कार्यवाही करणे शक्य होणार आहे, असे मुख्य वनसंरक्षक (प्रा) ठाणे के. प्रदिपा यांनी कळविले आहे.