नेशन न्यूज मराठी टीम.
बुलढाणा / प्रतिनिधी – महार रेजिमेंटचा इतिहास सर्वश्रुत आहेच. सैनिकी शिस्त आणि बलिदानाच्या बळावर देशासाठी योगदान देणाऱ्या महार रेजिमेंटचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीला माहिती व्हावा आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा यासाठी बुलढाण्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन 1 ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे, अशी माहिती माजी सैनिक तथा यशसिद्धी सैनिक सेवा संघाचे अनिल डोंगरदिवे यांच्याकडून देण्यात आली आहे.
1 ऑक्टोबर हा महार रेजिमेंटचा स्थापना दिवस आहे. या रेजिमेंटच्या स्थापना दिवसाच्या वर्धापन निमित्त बुलढाणा येथील खामगाव रोड भागात असलेल्या गोल्डन पॅलेस येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी सकाळी साडेनऊ वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मानवंदना देऊन सैनिक सन्मान रॅली काढण्यात येणार आहे. यामध्ये 1965 व 71 व कारगिल युद्धात सहभागी सैनिकांचा सन्मान या कार्यक्रमाच्या रॅलीच्या निमित्ताने करण्यात येणार आहे. या रॅलीचा समारोप गोल्डन पॅलेस येथे कार्यक्रम स्थळी होईल. त्यानंतर ध्वजारोहण, पथसंचलन असे कार्यक्रम पार पडतील. दुपारी 12 वाजता मंचावरील कार्यक्रमाला सुरुवात होईल.
यात कार्यक्रमाचे उद्घाटन बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते होईल, तर भीमा कोरेगाव युद्धातील सरसेनापती सिदनाक यांचे वंशज मिलिंद इनामदार हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राहणार आहेत. कार्यक्रमा दरम्यान देश सेवेसाठी प्राणाची आहुती दिलेल्या शहिदांच्या कुटुंबांचा सन्मान तसेच सेवानिवृत्त झालेल्या व विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सैनिकांचा याप्रसंगी सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन माजी सैनिकांच्या वतीने करण्यात आले आहे.