नेशन न्यूज मराठी टीम.
सोलापूर / प्रतिनिधी – नागरिकांची अनेकदा सरकारी यंत्रणेकडून दिशाभूल झाल्याचे आपण ऐकले असेल. पण सोलापूर जिल्ह्यात तर आरोग्य प्रकल्पाची पाहणी’ करण्यासाठी आलेल्या लोकप्रतिनिधींचीच दिशाभूल झालेली पाहण्यात आली. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू हे काही दिवसांपूर्वी सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याकडून बच्चू कडूंची दिशाभूल करत दिव्यांगांच्या फिजिओथेरपी सेंटरला न घेऊन जाता दुसऱ्याच ठिकाणीच सेंटर दाखवल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाने केला आहे. याचा निषेध करत आज प्रहारकडून मनपाच्या धुळ खात पडून असलेल्या फिजिओथेरपी सेंटर समोरील चिखलात झोपून प्रहारकडून आंदोलन करण्यात आलं आहे.
मागच्या कित्येक महिन्यांपासून महापालिकेचे फिजिओथेरपी सेंटर बंद आहे. त्यामुळे असंख्य दिव्यांग बांधवांची गैरसोय होत असल्याचा आरोप प्रहारकडून करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित आरोग्य अधिकारी यांच्यावर कारवाई करा अन्यथा त्यांच तोंड काळ करण्याचा इशारा प्रहारकडून देण्यात आला आहे. दरम्यान, प्रहारच्या आंदोलक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.