नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण / प्रतिनिधी – महाराष्ट्रात सुरु असलेला गणेशोत्सव हा देशभर चर्चेचा विषय असतो. त्यातील मुख्य कारण म्हणजे आपल्या लाडक्या बापाची सुबक आकर्षक मूर्ती अन त्याच्या अवतीभोवतीची आरास. त्यात मुंबई व आजूबाजूच्या परिसरातील मूर्तीचा आकार आणि त्यातून समाजोपयोगी संदेश देणारे देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी असते. मूर्तिकार आपल्या कल्पकतेचा कस लावत सृजनशीलतेला आकार देत जातो. कलाकाराचे व मंडळातील कार्यकर्त्यांचे कौतुक करण्यासाठी अलीकडे गणपती सजावट स्पर्धा देखील घेतल्या जातात. आपला लाडका बाप्पा देखील असाच आकर्षक असावा या हेतूने कल्याण मध्ये भाजी विक्रेते शेतकरी व्यावसायिक यांनी देखील अशीच आकर्षक आरास केलेली पाहायला मिळाली आहे.
टोमॅटो हा अलीकडे भाव वधारल्याने चांगलाच चर्चेत आहे. आता कल्याणमध्ये गणपतीच्या आरासामुळे हा टोमॅटो चांगलाच प्रसिद्ध होत आहे. कल्याणामधील भाजी विक्रेते अरुण हारक हे मुळचे शेतकरी असून,आपल्या शेतातील शेतमाल ते कल्याण भाजी मार्केट मध्ये विकतात. दरवर्षी गणेशोत्सवात हे फळे, फुलापासून देखावे साकारतात. यावर्षी हारक यांनी आपल्या शेतातील टोमॅटो वापरून बाप्पाची आरास तयार केली आहे.२०० किलो टोमॅटो पासून त्यांनी हा सुबक देखावा साकारला आहे.