नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/ प्रतिनिधी – वीज कंत्राटी कामगारांना २० हजार रुपये पगार वाढीची मागणी वीज कंत्राटी कामगार संघाने केली असून याबाबतचा प्रस्ताव वीज कंपनीला महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्यां पदाधिकाऱ्यांनी नुकताच सादर केला आहे.
राज्यातील महावितरण महापारेषण व महानिर्मिती कंपनीतील नियमित रिक्त पदांवर मागील 15 ते 20 वर्षे काम करत असलेल्या वीज कंत्राटी कामगारांना कायम करण्यात यावे अथवा समान काम समान वेतन किंवा कंत्राटदार विरहित रोजंदारी पद्धतीने वयाच्या 60 वर्षा पर्यंत जॉब सिक्युरिटी देण्यात यावी.
या बाबत धोरणात्मक निर्णय घेई पर्यंत या कामगारांना 20 हजार रुपये पगारवाढ करावी. त्यांना सुरक्षा साधने, मेडिक्लेम, प्रशिक्षण, गणवेश, रेनकोट, बूट, गणवेश धुलाई भत्ता, मोबाईल व पेट्रोल भत्ता, ओव्हर टाईम,जादा सुट्या मिळाव्या अशा अनेक कामगार हिताच्या मागण्या संघटनेने केल्या आहेत.
मागील कराराच्या वेळेस मुळ वेतनात केवळ 20% ,पगार वाढ मिळाली होती. ऊर्जामंत्री व वीज कंपनी प्रशासन यावेळी देखील सहानुभूती पूर्वक या मागण्याचा विचार करेल असा विश्वास संघटनेने व्यक्त केला असल्याची माहिती महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे कल्याण परिमंडळ अध्यक्ष मनोज मनुचारी यांनी दिली.