नेशन न्यूज मराठी टीम.
नवी दिल्ली / प्रतिनिधी – बालपणीच्या रम्य दिवसांकडे मागे वळून पाहताना, आपण चाचा चौधरीच्या चित्रकथांच्या सोबतीने मोठे झालो, त्यावेळी वाचलेल्या साहसांचे स्मरण करतो. चाचा चौधरी आणि साबू या पात्रांनी सर्व पिढ्यांमधील वाचकांच्या हृदयात एक विशेष स्थान मिळवले आहे. कारण या पात्रांनी संवाद आणि कृतींनी प्रेक्षकांना मोहित केले आहे.
चाचा चौधरी चित्रकथांची प्रचंड लोकप्रियता पाहता, एक अनोखा उपक्रम म्हणून, “चाचा चौधरी और चुनवी दंगल” या चित्रकथा पुस्तकाचे आज नवी दिल्लीतील ‘निर्वाचन सदन’ येथे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार तसेच निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे आणि अरुण गोयल यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
हा कॉमिक्सचा अंक भारतीय निवडणूक आयोग आणि प्राण कॉमिक्स यांचा संयुक्त उपक्रम आहे. तरुणांना लोकशाहीच्या उत्सवात मतदार यादीत नावनोंदणी करण्यासाठी आणि मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रेरणा देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाची रचना करण्यात आली आहे. यात प्रसिद्ध व्यंगचित्रकार दिवंगत प्राण कुमार शर्मा यांनी साकारलेल्या चाचा चौधरी, साबू, बिल्लू या लोकप्रिय व्यंग व्यक्तिरेखांचा समावेश आहे.
हे व्यंगचित्र पुस्तक एक बहुआयामी साधन म्हणून काम करत मतदार जागृतीच्या विविध गंभीर पैलूंवर भाष्य करेल. आगामी निवडणुकांमध्ये तरुणांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करून, तरुण पात्र मतदारांना स्वतःची नाव नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करणे हे या उपक्रमाचे प्राथमिक लक्ष्य आहे.
हे व्यंगचित्र पुस्तक छापील आणि डिजिटल दोन्ही स्वरूपांमध्ये उपलब्ध असून सर्व व्यासपीठांवर याची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, भविष्यातील मतदारांना निवडणुकीबद्दल शिक्षित करून युवकांना प्रेरणा देण्यासाठी या कॉमिक अंकाच्या मोफत प्रती शाळांमध्ये वितरित केल्या जाणार आहेत.
कॉमिकची डिजिटल प्रत येथे मिळू शकते: https://ecisveep.nic.in/files/file/2152-chacha-chaudhary-aur-chunavi-dangal/
या कार्यक्रमाला प्राण कॉमिक्सचे संचालक आणि प्रकाशक निखिल प्राण तसेच निवडणूक आयोगाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.