नेशन न्यूज मराठी टीम.
अहमदनगर / प्रतिनिधी – दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोला उच्चांकी भाव मिळाले होते. मात्र आता याच टोमॅटोला अवघा तीन ते चार रुपये किलोचा बाजारभाव मिळत आहे. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे, अशी व्यथा माहुली – खंदरमाळ (ता.संगमनेर) येथील शैलेश गाडेकर या टोमॅटो उत्पादक शेतकर्याने मांडली आहे.
खंदरमाळ गावांतर्गत असलेल्या माहुली येथील शैलेश गाडेकर यांनी टोमॅटोला चांगले बाजारभाव असल्याने जुलै महिन्यात जवळपास एक-एकर क्षेत्रात मल्चिंग पेपरवर टोमॅटो रोपांची लागवड केली होती. त्यातच पाणी टंचाई असताना देखील त्यांनी टोमॅटो पिकाची चांगली काळजी घेतली.
टोमॅटो सुरू होवून दहा ते बारा दिवसांचा कालावधी झाला आहे. मात्र आता याच सोन्यासारख्या टोमॅटोला अवघा तीन ते चार रुपये किलोचा बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे गाडेकर यांनी डोक्यालाच हात लावला आहे. झालेला खर्चही वसूल होतो की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.दोन महिन्यांपूर्वी याच टोमॅटोला उच्चांकी बाजारभाव मिळत होते. म्हणून या आशेवर टोमॅटो पीक घेतले. पण बाजारभाव कोसळल्याने टोमॅटो पिकावर झालेला सर्व खर्च अंगलट येणार आहे अशी व्यथाही शैलेश गाडेकर या तरूण शेतकर्याने मांडली आहे.
सध्या पावसाने दडी मारल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांसह वाड्या-वस्त्यांवर पिण्याचे पाण्याचे टँकर सुरू आहे. अशा कठीण परिस्थितही पिंपळगाव देपा, खंडेरायवाडी आदी गावांमधील शेतकर्यांनी खासगी टॅंकरव्दारे विकतचे पाणी आणून टोमॅटोचे फड जगवले आहेत. पण टोमॅटोला कवडीमोल बाजारभाव मिळू लागल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहे.