नेशन न्यूज मराठी टीम.
धुळे / प्रतिनिधी – कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. तसेच सरकारी शाळा खाजगी कंपन्यांना चालवायला देण्याचा विचार प्रस्तावित आहे.सरकारी नोकऱ्यांचे खासगीकरण करणाऱ्या शासनाच्या धोरणाला तीव्र विरोध करीत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी सोमवारी भोजनकाळात राज्यभर निदर्शने केली.पीएफआरडीए कायदा रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करण्यात आली.
शासकीय कर्तव्य-जबाबदाऱ्या पार पाडताना अडथळा आणणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या समाजकंटकांना कडक शिक्षेची व कारवाईची तरतूद असलेल्या कायद्यात शासनाने घिसडघाईने बदल करून शिक्षेची तरतूद काढून घेतली आहे. सरकारी कामात अडथळा व दबाव निर्माण करून गुंड प्रवृत्तीच्या समाजकंटकांना, कार्यकर्त्यांना मोकळीक करून दिली आहे. ही बाब निषेधार्थ आहे. त्यामुळे या विरोधात आज सकाळीच धुळे शहरात क्यूमाईन क्लबसमोर निदर्शने करण्यात आली.
सरकारी, निम सरकारी कर्मचारी व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी वर्ग ड कर्मचारी महासंघ, जिल्हा परिषद कर्मचारी युनियन, माध्यमिक शिक्षक संघटना, माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, प्राथमिक शिक्षक समिती, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, प्राथमिक शिक्षक संघटना, लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना, एनपीएस व कंत्राटी कर्मचारी संयुक्त समिती, बेरोजगार युवक विद्यार्थी संघटना मोठ्या संख्येने निदर्शनादरम्यान उपस्थित होत्या.