नेशन न्यूज मराठी टीम.
ठाणे / प्रतिनिधी – पर्यावरण पूरक गणेशोत्सवाच्या पार्शभूमीवर ठाण्यात विसर्जन घाटांची विकासकामे सुरु आहेत. मात्र ह्या कामांचा दर्जा व गती याबाबत आमदार संजय केळकर यांनी या कामांची पाहणी करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. संजय केळकर म्हणाले, स्मार्ट सिटी योजनेंतर्गत ठाण्यात सुरू असलेल्या विसर्जन घाटांची विकासकामे निकृष्ट दर्जाची असून कूर्मगतीने सुरू आहेत.
गणेशोत्सव तोंडावर आला असून स्मार्ट सिटी योजनेंतर्गत गणेश विसर्जन घाटांची कामे शहरात सुरू आहेत. आज साकेत-बाळकुम, कशेळी आणि कोलशेत या विसर्जन घाटांची पाहणी केली.विसर्जन घाट केवळ गणपती विसर्जनासाठी नसून त्याचा वापर वर्षभर विविध कार्यक्रम आणि सणांसाठी होतो, त्यामुळे या घाटांचे बांधकाम उच्च दर्जाचे आणि सुविधांनी युक्त असायला हवे. या महत्वाच्या कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई केली पाहिजे.
या विकासकामांसाठी १५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. शहरातील रस्त्यांच्या कामासाठी राज्य सरकारने ६०५ कोटींचा निधी दिला. ही कामे झाल्यानंतर त्याचे थर्ड पार्टी ऑडिट केल्याशिवाय ठेकेदारांना बिले अदा करू नयेत, असे निर्देश आहेत.मात्र ऑडिटशिवाय बिले अदा केल्याचे आढळून येत आहे, या प्रकरणी आयुक्तांनी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे. असे देखील ते म्हणाले.