नेशन न्यूज मराठी टीम.
धुळे/प्रतिनिधी – भाजप नेते किरीट सोमय्या यांचे वृत्त कायद्याच्या चौकटीत राहून प्रसारीत करणाऱ्या लोकशाही वाहिनीचे संपादक कमलेश सुतार यांचेवरील गुन्हे मागे घेण्यात यावे, अशी मागणी श्री विश्वकर्मा संस्था, वेस्ट खान्देश, धुळे तर्फे आज जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. गुन्हे मागे न घेतल्यास राज्यभर आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. दरम्यान मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निदर्शनेही करण्यात आलीत.
यावेळी विश्वकर्मा संघटनेचे पराग अहिरे यांनी सांगितले की, एका वृत्त वाहिनीने काही दिवसांपूर्वी भाजपा नेते किरीट सोमय्या यांचे वृत्त कायद्याच्या चौकटीत राहून प्रक्षेपित केले. तसा खुलासा देखील त्यांनी केला. हे प्रकरण विधी मंडळापर्यंत गेले असता विरोधी पक्षाने याबाबत सखोल चौकशीची मागणी केली. त्यास गृहमंत्री, मुख्यमंत्री यांनी चौकशीचे आश्वासन दिले. मात्र चौकशी पूर्ण न करता पत्रकार कमलेश सुतार यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला. हा अन्याय असून भारतीय लोकशाहीतील चौथा स्तंभ संबोधल्या जाणाऱ्या पत्रकारितेवर अशा प्रकारे गुन्हे दाखल करून सरकार दडपशाही करीत आहे. राज्यातील प्रमुख पत्रकारांची जर अशी परिस्थिती असे तर सर्वसामान्यांचे काय ? अशी भिती सर्वसामान्य नागरिकांना आहे. त्यामुळे पत्रकार कमलेश सुतार यांचेवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे अन्यथा राज्यभराती तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
या आंदोलनादरम्यान विश्वकर्मा संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र हिरे, उपाध्यक्ष संतोष मिस्तरी, दिपक शार्दुल, सचिव महेंद्र शार्दूल, खनिजदार गंगाराम देसले, संघटक मधुकर हिरे यांचेसह ज्येष्ठ सल्लागार भिकाजी जगताप, गोपाल कुवर, राजेंद्र गवळे, पराग अहिरे यावेळी उपस्थित होते.