नेशन न्यूज मराठी टीम.
नवी दिल्ली / प्रतिनिधी – भारत-ब्रिटन आर्थिक आणि वित्तीय संवादाची मंत्रिस्तरीय 12वी फेरी आज नवी दिल्ली येथे झाली. भारतीय प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी तर ब्रिटनच्या प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व ब्रिटनचे चांसलर ऑफ द एक्स्चेकर, जेरेमी हंट यांनी केले.
भारत आणि ब्रिटनने वित्तीय सेवांसंबंधी सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी, एकमेकांच्या सामर्थ्यांवर आधारित तसेच आर्थिक समावेशकता आणि शाश्वत विकासासाठी परस्परांच्या आकांक्षांना सहाय्य करण्याप्रति वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. GIFT IFSC मध्ये वित्तीय सेवा आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याबाबत भारताकडून राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांबाबत आशावाद तसेच त्याला पाठिंबा देण्याप्रति ब्रिटनची वचनबद्धता दिसून आली.
पायाभूत सुविधांच्या विकासाचे प्राधान्यक्रम, मजबूत फिनटेक भागीदारी आणि दीर्घकालीन विकासाच्या उद्दिष्टांसाठी शाश्वत वित्तपुरवठा यांना चालना देण्यासाठी भारत आणि ब्रिटन दरम्यान ज्ञानाची देवाणघेवाण, सहकार्य आणि पाठिंबा या बाबींवरही या संवादाचा भर होता.
दोन्ही देशांनी व्यापक आर्थिक आणि बहुपक्षीय मुद्द्यांवर परस्पर सहकार्य वृद्धिंगत करण्याबाबतही चर्चा केली. दोन्ही देशांनी भारताच्या राष्ट्रीय इन्फ्रास्ट्रक्चर पाइपलाइनच्या समर्थनार्थ कौशल्य आणि गुंतवणूकीचा लाभ उठवण्यासाठी भारत-ब्रिटन पायाभूत वित्तपुरवठा पूल या सहकार्यात्मक उपक्रमाची घोषणा केली. भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री आणि ब्रिटनचे चॅन्सलर ऑफ एक्सचेकर यांनी संयुक्त निवेदनाचा स्वीकार केल्यानंतर संवादाचा समारोप झाला.
या संवादाच्या निमित्ताने, उभय मंत्री भारत-ब्रिटन आर्थिक भागीदारी बैठकीतही सहभागी झाले. सहभागी झालेल्यामध्ये भारत आणि ब्रिटनमधील प्रमुख उद्योजक तसेच दोन्ही देशांतील वित्तीय नियामकांचे प्रतिनिधी यांचा समावेश होता. भारत-ब्रिटन आर्थिक भागीदारी बैठकीत, इतर गोष्टींबरोबरच, दोन्ही देशांमधील आर्थिक देवाणघेवाण आणि सहकार्य वृद्धिंगत करण्यासंबंधित कल्पना तसेच धोरणात्मक पेपर्सबाबत देखील चर्चा झाली