नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई / प्रतिनिधी – जालना जिल्ह्यातील आंतरवली सराठी मराठा क्रांती मोर्चा आंदोलकावर झालेल्या लाठीचार्ज व त्यानंतर त्याचे उमटणारे पडसाद पाहता शिवसेनेचे युवा नेतृत्व माजी मंत्री आदित्य ठाकरे ह्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तेव्हा ते म्हणाले, शासन आपल्या दारी कार्यक्रम घ्यायचा म्हणून लाठीचार्ज करण्यात आला. पोलीस अशा आंदोलनात लाठीचार्ज करत नाहीत. परिस्थिती बिघडू नये यासाठी आदेश घेतले जातात. शासन सांगताय की आम्ही आदेश दिले नाहीत मग प्रशासन चालतं कसं? सरकार कसं चालतं हे राज्यपालांनी सत्तेतील सरकारला शिकवावं.
आता सरकार एखादी समिती नेमतील. एखादा अधिकाऱ्याला निलंबित करतील. ज्यांनी लाठीचार्ज केले त्यांच्यावर कारवाई होईल परंतु ज्यांनी आदेश दिले त्यांना काहीही होणार नाही. हे आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. जालना घटनेचा खरा जनरल डायर कोण? लाज असेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.
मविआ च्या आमदारांना निधी मिळालेला नाही. जे तिकडे गेले त्यांना निधी मिळतो. नुसतं नाव बदलून काही होत नाही तर कामाबाबत बोललं पाहिजे. मणिपूर मध्ये जे महिलांचं रक्त सांडलं त्याबाबत बोललं पाहिजे, जालना येथे लाठीचार्ज केला ते भारतवासी आहेत. G20 साठी जे फडका लावून लपलेत ते देखील भारतवासी आहेत. अश्या स्पष्ट शब्दात राजकीय परिस्थितीबाबत आदित्य यांनी आपले मत मांडले.