कल्याण / प्रतिनिधी – कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांचे सामान चोरी होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यादरम्यान दोन सराईत चोरटयांना कल्याण रेल्वे क्राईम ब्रंच पोलिसांनी अटक केली आहे. हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले होते. यांच्याकडून सोन्याचे दागिने आणि पाच मोबाईल टॅब असा जवळपास चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. चोरट्यांना गजाआड केल्यानंतर या दोन चोरट्यांवर पाच गुन्हे उघडकीस करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
कल्याण रेल्वे स्थानकावर मेल एक्सप्रेसमध्ये चढणाऱ्या एका प्रवाशाची सोन्याच्या दागिने असलेले बॅग घेऊन एका चोरट्याने पळ काढला होता. याप्रकरणी कल्याण रेल्वे क्राईम ब्रंच तपास करत होती. क्राईम ब्रांचचे पोलिस अधिकारी अरशुद्दीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला. स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता एक चोरटा सिसिटीव्हीमध्ये दिसून आला. पोलिसांनी या चोरट्याची ओळख पटवून दिनेश निनावे या चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या चौकशी दरम्यान त्याच्या साथीदाराची माहिती पोलिसांना मिळाली.
दरम्यान पोलिसांनी सापळा रचत त्याचा साथीदार संतोष चौधरी याला देखील बेड्या ठोकल्या आहेत. हे दोघे सराईत चोरटे असून त्यांच्याकडून पाच गुन्ह्यांची उकल करण्यात रेल्वे क्राईम ब्रँचला यश आले आहे. त्यांच्याकडुन सोन्याचे दागिने, पाच मोबाईल, टॅब असा जवळपास चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या पुढील तपास सुरू आहे आणखी काही गुन्हे उघडकीस येणार असल्याची शक्यता आहे.