नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण / प्रतिनिधी – उल्हासनगर एक उपविभागातील अशोका बारमध्ये गेल्या ३४ महिन्यांपासून सुरू असलेली वीजचोरी महावितरणच्या पथकाने उघडकीस आणली आहे. एकूण १८ लाख ६७ हजार रुपयांच्या वीजचोरी प्रकरणी बार चालकाविरुद्ध कारवाई करण्यात आली.
उल्हासनगर एक पोलिस चौकीजवळच्या शॉप क्रमांक ५७५ येथील अशोका बारच्या वीज पुरवठ्याची महावितरणच्या पथकाने तपासणी केली. मीटरचा ‘बी’ फेज चेंज करून चोरुन वीज वापरण्याची यंत्रणा बार चालकाने बसवल्याचे पथकाला आढळून आले. वीज मीटर दिवंगत एकनाथ तुळशीराम नेरकर यांच्या नावावर असून बारचालक कुमार तुळशीराम नेरकर यांनी गेल्या ३४ महिन्यात ९१ हजार ६७७ युनिट विजेचा चोरटा वापर केल्याचे अधिक तपासणीत निष्पन्न झाले आहे. चोरीच्या विजेचे देयक व तडजोडीची रक्कम भरण्याबाबत बार चालकाला नोटिस बजावण्यात आली आहे. विहीत मुदतीत या रकमांचा भरणा न झाल्यास वीज कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये वीजचोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पोलिसांत फिर्याद देण्यात येणार आहे.
कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनजंय औंढेकर व कल्याण दोन मंडलचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर एकचे कार्यकारी अभियंता सतीश कुलकर्णी, उपकार्यकारी अभियंता सुनिल पावरा, सहायक अभियंता जयेश बेंढारी, तुषार सातकर, वरिष्ठ तंत्रज्ञ महेंद्र रोठे, वसंत पाडवी, मनोज राठोड, विद्युत सहायक प्रितीलाल पांडव यांच्या पथकाने ही कारवाई केली.