नेशन न्यूज मराठी टीम.
सोलापूर / प्रतिनिधी – हॉटेल ढाब्यांवर बसून दारु पिणा-यांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा बडगा उगारला असून सोलापूर शहर परिसरातील ढाब्यांवर टाकलेल्या धाडीत ३ हॉटेल चालकांसह ११ मद्यपी ग्राहकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरिक्षक राहूल बांगर यांच्या पथकाने सोलापूर शहरातील अक्कलकोट रोडवरील होटेल स्वाद या ढाब्यावर छापा टाकला असता ढाबा चालक हा ग्राहकांना मद्य पिण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देत असतांना आढळून आल्याने त्याचेसह ४ मद्यपी ग्राहकांना अटक करण्यात आली.
एका अन्य कारवाईत दुय्यम निरिक्षक कृष्णा सुळे यांच्या पथकाने सोलापूर – मंगळवेढा रोडवरील हॉटेल सह्याद्री याठिकाणी छापा टाकून ढाबा चालक व ३ मद्यपी ग्राहक यांना अटक केली तर सोलापूर-विजापूर रोडवरील होटेल मैत्री याठिकाणी दुय्यम निरिक्षक उषाकिरण मिसाळ यांच्या पथकाने छापा टाकून ढाबा चालक व ४ मद्यपी ग्राहकांना अटक केली. महाराष्ट्र दारुबंदी कायद्याच्या कलमान्वये तिन्ही धाबा चालकांविरुद्ध , ग्राहकांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
गुन्ह्यातील तपास अधिका-यांनी एका दिवसात गुन्ह्याचा तपास पूर्ण करून आरोपपत्र न्यायालयात सादर केले असता मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दारूबंदी न्यायालय श्रीमती नम्रता बिरादार यांनी तिन्ही हॉटेल चालकांना प्रत्येकी २५ हजार रुपये दंड व सर्व अकरा मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक राहूल बांगर, दुय्यम निरीक्षक उषाकिरण मिसाळ, कृष्णा सुळे, सहायक दुय्यम निरीक्षक अलीम शेख, जवान किरण खंदारे, चेतन व्हनगुंटी, शोएब बेगमपुरे यांच्या पथकाने पार पडली. शासनाच्या वतीने सरकारी वकील संतोष पाटील यांनी मा. न्यायालयात समक्षपणे बाजू मांडली. कोर्ट ऑर्डर्ली मयुरेश भोसेकर यांनी न्यायालयीन प्रक्रियेत मदत केली.