नेशन न्यूज मराठी टीम.
संभाजीनगर/प्रतिनिधी – एका 14 वर्षीय मुलाने शिट्टी गिळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉक्टर म्हणाले की, मुलगा श्वास घेत होता तेव्हा त्याच्या तोंडातून शिट्टी वाजल्याचा आवाज येत होता. त्याच्या घरच्यांना हा आवाज ऐकून आश्चर्य वाटलं व त्यांनी खाजगी रुग्णालयात दाखविले. परंतु खर्च जास्त सांगत असल्यामुळे त्यांनी त्याला शासकीय वैद्यकीय रुग्णालय घाटी येथे दाखल केलं.
घाटी येथील एनटी विभागाचे प्रमुख डॉ. सुनील देशमुख म्हणाले की, धुळे शहरातील अजय हा 14 वर्षीय तरुण इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये आमच्याकडे आला त्याच्या गळ्यामध्ये शिट्टी अडकली होती. तो जेव्हा श्वास घ्यायचा तेव्हा शिट्टीचा आवाज येत होता. यामुळे त्याला श्वास घेण्यासाठी सुद्धा त्रास होत होता. जेव्हा त्याच्या गळ्याचा एक्स-रे काढला. तेव्हा त्यात दिसून आले की, यामध्ये शिट्टी अडकली आहे. त्याला तात्काळ दवाखान्यात आणल्यामुळे त्याचे दुर्बीणद्वारे ऑपरेशन करण्यात आले असून मुलाला जीवनदान देण्यात आले आहे. डॉक्टर म्हणत होते की तो जेव्हा घाटीत आला तेव्हा आमच्याशी चर्चा करत होता त्यावेळेस शिट्टीचा आवाज येत होता.
हाच उपचार जर खाजगी दवाखान्यात केला असता तर 50 ते 60 हजार रुपयांच्या वर खर्च लागला असता परंतु तरुणाच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय छत्रपती संभाजीनगर गाठुन येथे दाखल करून त्याच्यावर विनाशुल्क उपचार करून घेतला आहे.