नेशन न्यूज मराठी टीम.
जालना / प्रतिनिधी – महिला व अल्पसंख्यांक समाजावर अत्याचार करून मनुवादी विचारसरणी लादू पाहत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रभारी जितेंद्र शिरसाट यांनी केला. महिला अत्याचाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीची कलेक्टर कचेरी समोर निदर्शने करण्यात आली यावेळी ते बोलत होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व इतर कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिरसाट म्हणाले महिला अल्पसंख्यांक समाजावर अन्याय, अत्याचार करून त्यांचे खच्चीकरण केले जात आहे. मणिपूर राज्यातील घटना याच विचारसरणीतून झाल्या असून असेच प्रयोग देशभर राबवले जात आहे. तसेच महाराष्ट्रात महापुरुषांची बदनामी करण्याचे षडयंत्र मनोहर भिडे यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. भिडे याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल असताना त्यांना अटक करण्याची हिम्मत राज्य सरकारने केली नाही.असे वंचितच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.
महाराष्ट्रात मनुवादी विचारसरणी लादण्याचे प्रयत्न वंचित बहुजन आघाडी हाणून पाडणार असल्याचा इशाराही जितेंद्र शिरसाट यांनी दिला. यावेळी कार्यकर्त्यांनी मणिपूर घटनेचा निषेध नोंदवत आपल्या भावना व्यक्त केल्या. धरणे व निदर्शने झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉक्टर कृष्णनाथ पांचाळ यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.