नेशन न्यूज मराठी टीम.
धुळे / प्रतिनिधी – शिरपूर शहर पोलिसांनी इंदोर कडून धुळ्याकडे येत असलेल्या ट्रक मधून लाखो रुपयांचे सुगंधी तंबाखू व पानमसाला जप्त केला आहे. शिरपूर शहर पोलिसांना रात्री अडीच वाजेच्या सुमारास गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली होती. की इंदोर कडून धुळ्याच्या दिशेने शिरपूर टोल नाक्यावरून ट्रक मधून मोठ्या प्रमाणात सुगंधी तंबाखू व पानमसाला वाहून नेला जात आहे. या माहितीच्या आधारे शिरपूर शहर पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ पथक तयार करून शिरपूर टोल नाक्यावर सापळा रचला.
या सापळा दरम्यान संबंधित माहिती मिळालेला ट्रक पोलिसांना दिसून आला, पोलिसांनी तात्काळ हा ट्रक थांबवत त्यातील चालक व वाहकास ट्रक मध्ये असलेल्या माला संदर्भात विचारपूस केली असता, त्यांनी ट्रक मध्ये इलेक्ट्रिक वायर्स व तांदूळ असल्याचे सांगितले. पोलिसांनी खातर जमा करण्यासाठी ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये तांदूळ व इलेक्ट्रिक वायरच्या आडून मोठ्या प्रमाणात तंबाखू व पान मसाला पोलिसांना आढळून आला आहे, पोलिसांनी हा ट्रक ताब्यात घेत ट्रक मधील चालक व वाहक देखील ताब्यात घेतले असून, या कारवाईदरम्यान पोलिसांनी जवळपास 40 लाख 83 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून पुढील कारवाई शिरपूर शहर पोलीस करीत आहेत.