नेशन न्यूज मराठी टिम.
नागपूर/प्रतिनिधी– स्वातंत्र्य दिन संपूर्ण देशातील नागरिक मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. मात्र, नागपूरच्या एका दृष्टीहीन चिमुकलीने स्वातंत्र्य दिवस अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरा केला आहे. ईश्वरी पांडे असे या 13 वर्षीय चिमुकलीचे नाव आहे. देशावर असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी आज ईश्वरीने अंबाझरी तलावात तब्बल अडीच किलोमीटर अंतर पोहत तलावाच्या मध्य भागी ध्वजारोहण करण्याची कामगिरी केली आहे.
तब्बल अडीच किमी पोहून ईश्वरीने अंबाझरी तलावाच्या अगदी मध्यभागी ध्वजारोहण केले आहे. गेल्या चार वर्षापासून ईश्वरी ही कामगिरी सातत्याने बजावत आहे. महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी नागपुरातील दृष्टी नसलेल्या व्यक्तीने तलावाच्या इतक्या आत जाण्याचा प्रयत्न देखील केलेला नाही. ज्यांनी आपला देश कधीही आपल्या डोळ्यांनी बघितलाच नाही. त्यांच्यासाठी आजच्या ऐतिहासिक दिवसाचे महत्व किती असेल? याचं उत्तर ईश्वरी पांडे हीने कृतीतून दिलं आहे. जगातील डोळस व्यक्तींना जे जमलं नाही, ते या चिमुकलीने करून दाखवलं आहे. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ईश्वरीने ही ऐतिहासिक कामगिरी पूर्ण केली आहे. ज्यावेळी ती परत आली तेव्हा तलावावर उपस्थित असलेल्या प्रत्येकाने ईश्वरीचे टाळ्या वाजवून स्वागत केले.