नेशन न्यूज़ मराठी टिम.
कल्याण/प्रतिनिधी – नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकारने ‘इझ ऑफ लिव्हिंग’ संकल्पना आणली आहे. यात वीजपुरवठा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यानुसार ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठ्यासह सर्व सेवा तत्परतेने देण्याचे आदेश महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी कर्मचाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार कल्याण परिमंडलाने गेल्या अडीच महिन्यात खंडित वीजपुरवठा, वीजबिल व इतर अशा १ लाख ७६ हजार ११० तक्रारींचे तातडीने निवारण केले आहे.
वीज ही मूलभूत गरज आहे. ही महत्त्वाची गरज भागवण्यासाठी ग्राहकांना फारवेळ लागू नये यासाठी ग्राहकांना नवीन वीजजोडणीसह सर्व सेवा तत्परतेने देण्यावर महावितरणचा भर आहे. कल्याण परिमंडलात मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना प्रलंबित वीजजोडणी देणे, ग्राहकांच्या वीजपुरवठ्याच्या तक्रारी, वीजबिलाबाबतच्या तक्रारी, इतर तक्रारी निर्धारित कालावधीत निकाली काढण्याचे निर्देश दिले.
कल्याण परिमंडलात खंडित वीजपुरवठ्याच्या तक्रारींचे प्राधान्याने निराकरण करण्यात येत आहे. जून २०२३ पासून आतापर्यंत वीजपुरवठा बंदच्या १ लाख २६ हजार ४८१ तक्रारींचे निवारण करण्यात आले. वीजबिलाबाबतच्या ६३ हजार १८० आणि इतर सेवाविषयक ६ हजार ८१६ तक्रारी सोडवण्यात आल्या. अडीच महिन्यात एकूण १ लाख ७६ हजार ३७३ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यातील १ लाख ७६ हजार ११० तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यात आले. तर उर्वरित २६३ तक्रारींचे प्राधान्याने निवारण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कल्याण मंडल एक कार्यालयांतर्गत प्राप्त ६५ हजार १०३ तक्रारींपैकी ६५ हजार २८, कल्याण मंडल दोन कार्यालयांतर्गत प्राप्त ३८ हजार ७३७ तक्रारींपैकी ३८ हजार ६७४, पालघर मंडलांतर्गत प्राप्त १९ हजार ७६१ तक्रारींपैकी १९ हजार ७२३ आणि वसई मंडलांतर्गत प्राप्त ५२ हजार ७७२ तक्रारींपैकी ५२ हजार ६८५ तक्रारी सोडवण्यात आल्या आहेत. मुख्य अभियंता औंढेकर हे वीज ग्राहकांच्या तक्रारी व त्यावर केलेल्या उपायांबाबत नियमित आढावा घेऊन आवश्यक सूचना देत आहेत.