नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महापालिकेने मोहने येथील एनआरसी कॉलनी मधील सर्व इमारती धोकादायक असल्याचे दर्शवून रहिवासी कामगारांच्या कुटुंबियांना एनआर व्यवस्थापनकरवी भर पावसात विस्थापित करण्यासाठी नोटीसा बजावल्या असल्याचा आरोप आयटक संलग्न कामगार युनियने केला असून हि नोटीस मागे घ्यावी यामागणीसाठी आज कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अ प्रभाग कार्यालय वडवली येथे आयटक युनियनतर्फे कामगारांचा मोर्चा काढण्यात आला.
एनआरसी व्यवस्थापनाने कामगारांचे थकबाकीचे रास्त हिशोब न देता तसेच मनपाचे कर प्राविइडंट फंडाची आणि महसूल खात्याची दंडाची रक्कम न भरता सर्व कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन करून आणि कोर्टाने दिलेल्या आदेशांचे पालन न करता ४००एखर जमिनीचा कब्जा घेऊन त्यावर मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरु केलेले आहे. मोहने येथील एनआरसी कॉलनीतील कामगारांची घरे रिकामी करण्याविरुध्दचा एनसीएलएटी दिल्ली यांचा मनाई हुकूम असतानाही इमारती धोकादायक ठरवून घेऊन सुरक्षेचं कारण दाखवून घरे रिकामी करून कामगारांचे थकबाकीचे कायदेशीर हिशोब न देता रहिवाशांना हुसकावून लावण्याचा अदानी व्यवस्थापनाला डाव साध्य करायचा असल्याचा आरोप मोर्चेकरांनी केला आहे.
त्या करिता सुस्थीतित आसतांनाही कामगारांच्या सदनिका काबिज करण्यासाठी धोकादायक ठरविण्यात येत आहेत व कोर्टात नोटीस दाखल करुन मनाई हुकूम शिथील करण्यासाठी अर्ज देखील केला गेला आहे. या षडयंत्रात केडीएमसी प्रशासनाने मदतरुप ठरू नये व नोटीस मागे घ्यावी यासाठी मनपाच्या अ प्रभाग वडवली कार्यालयवर आयटकच्या वतीने आज भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या प्रमाणावर महिलांचा समावेश होता. या मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य आयटकचे उपाध्यक्ष कॉम्रेड उदय चौधरी, राजेश त्रीपाठी, धनराज गायकवाड, श्रीकांत कांबळे, रोहित सोनावणे, प्राजक्ता कुळधर्म, फरीदा पठाण, शेवाळे आदी युनियन कार्यकर्त्यांनी केले.
मनपा प्रशासनातर्फे अ प्रभागचे उप अभियंता इनामदार यांनी मोर्चा समोर निवेदन स्वीकारले. मंगळवारी दुपारी या विषयावर संबंधितांची बैठक बोलावली जाईल असे आश्वासन यावेळी देण्यात आले.