नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – खड्ड्यांमुळे दुर्घटना घडल्यास संबंधित अभियंता आणि कंत्राटदाराला जबाबदार धरणार असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शहर अभियंत्यांनी दिली. गेल्या दोन दिवसांपासून कल्याण डोंबिवली परिक्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभुमीवर कल्याण डोंबिवली रस्त्यांची पाहणी करतेवेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक पडून त्यास दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे शहर अभियंता यांनी रस्त्यांवर पडलेले खड्डे तातडीने भरण्याचे निर्देश संबंधीत अधिका-यांना दिले. मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांवर खड्डे पडले असून सदर खड्डे भरण्याचे काम सुरू असून पावसामुळे काहीशी अडचण येत असली तरीही हे काम अव्याहतपणे सुरू राहणार आहे. क्विक सेटिंग सिमेंटच्या माध्यमातून हे खड्डे भरण्याच्या सूचना शहर अभियंता यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.
खड्डे भरण्याचे काम रात्री करण्याच्या तसेच संबंधित जबाबदार अभियंत्याने दररोज रस्त्यांवर प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केल्या. त्यांनी यावेळी दुर्गाडी किल्ला परिसर, पत्रीपुल, गोविंदवाडी, उंबर्डे, सहजानंद चौक, म्हसोबा चौक ठाकुर्ली, डोंबिवली पूर्व स्टेशन परिसर, लोकमान्य टिळक चौक आदी परिसरातील रस्त्यांची आणि खड्डे भरण्याच्या कामाची पाहणी केली