नेशन न्यूज मराठी टीम.
जळगाव/प्रतिनिधी – वडील फेरीवाले दुचाकीवरून गावागावात जाऊन कपडे विक्री करतात. तर आई एका कंपनीत कामगार म्हणून काम करते. मात्र या कष्टकरी दांम्पत्याच्या लेकीने तिच्या आई वडीलांच्या कष्टाची आणि परिस्थितीची जाणीव ठेवत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशाला गवसणी घातली आहे. कोमल सोपान शिंदे असे या तरुणीचे नाव असून तिची नुकतीच पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. अगदी प्रतिकूल परिस्थितीत कोमलने अंगावर खाकी चढवण्याचे आणि अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.
जळगाव शहरातील कानळदा रोड परिसरात कोमल सोपान शिंदे ही तरुणी वास्तव्याला आहे. आई वडील आणि एक लहान भाऊ असा तिचा परिवार. वडील सोपान शिंदे हे दुचाकीवर गावोगावी जाऊन कपडे विक्री करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तर कोमलची आई भारती या सुद्धा गेल्या दहा वर्षांपासून जळगावतील जैन इरिगेशन कंपनीमध्ये कामगार म्हणून काम करतात व पतीला उदरनिर्वाहासाठी हातभार लावतात. कोमल दहावी आणि बारावीचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर वाणिज्य शाखेतून पदवी घेतली आहे. तर एम एस डब्ल्यू पूर्ण करत तिचं पदव्यूत्तर शिक्षण सुद्धा पूर्ण झालं आहे. पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कोमलने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची माहिती घेत तयारी सुरू केली. २०१९ मध्ये क्लास लावला आणि पहिल्यांदा परीक्षा दिली. मात्र, कोमल हिला यात अपयश आलं. 2020 मध्ये कोमल हिने पुन्हा पोलीस उपनिरीक्षक पदासाठी अर्ज भरला मात्र कोरोनाच्या संकटामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. 2021 मध्ये सुद्धा ही परीक्षा झाली नाही. या परीक्षेसाठी सप्टेंबर महिना आणि 2022 हे साल उजाडलं. नुकत्याच लागलेल्या निकालात कोमल ही उत्तीर्ण झाली असून ती पोलीस उपनिरीक्षक झाली आहे. कोमल हीचं तिच्या गल्लीतील रहिवाशी नागरिकांना मोठं कौतुक आहे. तिच्या यशाबद्दल रहिवाशांनी कोमल हिची घोड्यावरून वाजत गाजत मिरवणूक काढून कोमलच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
आई वडीलांच कष्टाचं चीज झालं, आई वडीलांचे स्वप्न् पूर्ण केलं, त्यांचा मोठा अभिमान आहे, आई वडीलांना कपडेवाले सोपान नाही तर पीएसआयचे वडील सोपान म्हणून लोक जेव्हा हाक मारतात, त्याचा मोठा आनंद होतो. तर कुटुंबाची परिस्थिती नाजूक होती, आम्ही शिकलो नाही, मुलांनी शिकावं म्हणून आमची इच्छा होती, त्यानुसार मुलगी शिकली आणि पीएसआय झाली, आज मला खेड्यावर कपडे विकायला जातो, तेव्हा लोक पीएसआयचे वडील म्हणून जेव्हा हाक मारतात तेव्हा मोठा आनंद आणि गर्व आहे. आमचे कष्ट फळाला आल्याचेही कोमल हिचे वडील सोपान शिंदे हे सांगतात.
आम्ही जे कष्ट केलं, त्याच्या दुपटीने आनंद आमच्या मुलीने दिला असून पीएसआय होऊन आमचं स्वप्न पूर्ण केलं आहे. १२ १२ तास अभ्यास करायची, मला कामात सु्द्धा मदत करायची. व्हॉटस्ॲप असो की मोबाईल त्यापासून ती लांब होती, इतर हौस मौज करणाऱ्या मुलींना बघून माझ्या मुलीने कशाची हौस मौज याचा हट्ट केला नाही, त्याच मला खूप दु:ख व्हायचं. मुलगी पीएसआय झाल्याचा मोठा आनंद असल्याचे कोमल हिची आई भारती शिंदे यांनी बोलताना सांगितले.
कोमल शिंदे हिने हलाखीच्या परिस्थितीत जिद्दीने अभ्यास करत मिळवलेले यश हे तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.