नेशन न्यूज मराठी टीम.
धुळे/प्रतिनिधी – नांदेड येथील अक्षय भालेराव या दलित तरुणाचा खून केल्याची घटना घडल्यानंतर महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर तमाम धुळ्यात भिमसैनिकांतर्फे एल्गार मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात हजारो भीमसैनिक व महिला सहभागी झाल्या होत्या. हातात निळा झेंडा व विविध फलक घेऊन हजारोच्या संख्येने भीमसैनिक सहभागी झाले होते. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ अशा घोषणांनी शहर दणाणून सोडले होते.अक्षय भालेरावच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या अशा अनेक घोषणांनी धुळे शहर दणाणून गेले होते.
धुळे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून एल्गार महामोर्चाला सुरवात झाली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन मोर्चा मार्गस्थ झाला. येथून जेलरोडमार्गे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, आग्रारोड मार्गे पाचकंदील, कराचीवाला खुंट, झाशी राणी चौक, नवी महापालिकामार्गे क्युमाईन क्लबजवळ आला. या ठिकाणी राष्ट्रगिताने मोर्चाचा समारोप करण्यात आला आहे. दरम्यान, मोर्चात देण्यात आलेल्या जोरदार घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले होते. डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेसह काढण्यात आलेल्या मोर्चात तसेच विविध घोषणांचे फलक लक्ष वेधून घेत होते. त्यात, जातीवाद्यांना शिक्षा झालीच पाहीजे, अक्षय भालेरावला न्याय मिळालाच पाहीजे, अशा आशयाचे फलक आहेत.
मोर्चा क्युमाईन क्लबजवळ आल्यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाप्रशासनाला मागण्यांचे निवेदन देखील देण्यात आले. महाराष्ट्रात दलित अत्याचाराचे प्रमाण खूपच वाढले आहे. नांदेड येथील तरुण अक्षय भालेराव याने डॉ. बाबासाहेबांची जयंती साजरी म्हणून जातीवादी गावगुंडांनी पुर्वनियोजित पध्दतीने त्याचा खून केला. स्वतंत्र भारतात डॉ. बाबासाहेबांची जयंती साजरी करणे गुन्हा ठरविणाऱ्या जातीवादी मानसिकतेचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. गावगुंडांना कायद्याचा धाक उरलेला नाही. महाराष्ट्रात खैरलांजी, खर्डा, जवखेडा, शिर्डी आदी दलित अत्याचाराची प्रकरणे देशभरात गाजलेली आहेत.
त्यानंतरही शासनाने आवश्यक त्या उपाययोजना केलेल्या नाहीत. म्हणून सातत्याने अत्याचार घडत आहेत, याचा आम्ही निषेध करतो. अक्षय भालेराव या तरुणाच्या खूनानंतर मुंबईतील सावित्रीबाई फुले वसतीगृहातील दलित विद्यार्थीनीवर अत्याचार करण्यात आले, अशा घटना घडून सुद्धा सरकार या घटना गाभिर्याने घेत नाही ही बाब पुरोगामी महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही, या घटनांचा निषेध करण्यासाठी सदर एल्गार मोर्चा काढल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले आहे.यावेळी संपूर्ण आंबेडकरी समाजाचे एकजुटीचे दर्शन यावेळी झाल्याचे दिसून आले.