नेशन न्यूज मराठी टीम.
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – देशाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला ह्या आग्रस्थानी आहे.देशाच्या जडणघडणीत महिलांचा मोठा वाटा आहे. पुरुषांप्रमाणे महिला वेगवेगळ्या क्षेत्रात काम करून आपला कुटुंबाचा भार उचलत घर चालवितात. यात रिक्षा चालविण्यात महिला मागे नाहीत. नेहमीप्रमाणे सकाळी घरातील कामे आवरून रिक्षा किक मारली की सायंकाळी घरी परतणे हे दैनदिन जीवन जगणे महिला रिक्षाचालकांना चांगलेच जमले आहे.आता यात अडचण आली ती स्वतंत्र रिक्षा स्टॅडची. आपल्यालाही स्वतंत्र रिक्षा स्टॅड मिळावा अशी मागणी येथील महिला रिक्षाचालकांनी केली.पण या मागणीकडे उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि शहर वाहतूक नियंत्रण उपशाखेने लक्ष दिले नाही.गेली अनेक महिने हि मागणी होत असून महिला रिक्षाचालकांना अधिकृत स्वतंत्र रिक्षा स्टॅड उभे करण्याची परवानगी का दिली नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
डोंबिवली पश्चिम आणि पूर्व मिळून एकूण २५ महिला रिक्षाचालक आहेत.या महिला रिक्षाचालक अनेक रिक्षा स्टॅडवरआपली रिक्षा उभी करतात.तेव्हा त्यांना विविध समस्याना तोंड द्यावे लागते,त्यामुळे महिलांसाठी स्वतंत्र अधिकृत रिक्षा स्टॅड असावा यासाठी या सर्व महिला रिक्षाचालकांनी उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि शहर वाहतूक नियंत्रण उपशाखा , डोंबिवलीला कळविले. मात्र याकडे लक्ष दिले नसल्याने महिला रिक्षाचालकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. ठाकुर्लीत राहणाऱ्या नैना नाईक म्हणाल्या, माझे दहावी पर्यत शिक्षण झाले.पतीला संसारात हातभार लावावा याकरता कुरियर कंपनीत काम केले.मला वाहन चालविण्याची खूप आवड आहे. मी विचार केला कि आपली आवड हेच करिअर करून कुटुंबाला हातभार लावावा याकरता रिक्षा चालविण्याचे ठरविले.रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण घेऊन डोंबिवलीत रिक्षा चालविण्यास सुरुवात केली.चार वर्षापासून रिक्षा चालविते.आम्हाला स्वतंत्र अधिकृत रिक्षा स्टॅड द्या अशी मागणी आम्ही केली. मात्र आमच्या मागणीला केराची टोपली दाखविण्यात आली.
दरम्यान शहरात चौकाचौकात, गल्लीगल्लीत अनधिकृत रिक्षा स्टॅड असून त्यावर मात्र आजवर उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाई झाली नाही वर्षातून एकदा डोंबिवलीचे दर्शन घेण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी रिक्षा स्टॅडच्या सर्वे करण्यासाठी येतात. त्यानंतर हे कागदी घोडे कुठे नाचविले जातात हे अद्याप माहित पडले नाही. शहारात इतकी अनधिकृत रिक्षा स्टॅड असतील तर त्यावर कारवाई होत नाही मात्र स्वतंत्र महिला स्टॅडची मागणीकडे कानाडोळा केला जात आहे असे यातून दिसून येते आहे.