नेशन न्यूज मराठी टीम.
बुलढाणा/प्रतिनिधी – बुलढाण्याच्या ज्ञानगंगा अभयारण्यातील देव्हारी गावचे पुनर्वसन जवळपास गेल्या सात वर्षांपासून रखडलेले होते. त्या पुनर्वसनाचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. जिल्हा पुनर्वसन समितीने याला मान्यता दिली असून पुनर्वसनासाठी लागणाऱ्या 68 कोटी रुपये निधीपैकी 32 कोटी रुपये वनविभागाच्या वन्यजीव विभागाला प्राप्त झाले आहेत, आणि गावकऱ्यांकडून बंदपत्र घेण्याच्या प्रक्रियेला वन विभागाने सुरुवात केली आहे. अशी माहिती चेतन राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी, वन्यजीव बुलढाणा यांनी माध्यमांना दिली.
देव्हारी गाव चहुबाजूने जंगलाने व्यापले असून अभयारण्यात हिंस्त्र प्राणीदेखील वास्तव्यास आहेत, आणि त्यामुळे अनेकदा गावकऱ्यांवर बिबट अस्वल यांच्या हल्ल्यात अनेक जणांचा आपला जीव गमवावा लागला आहे, काही जण गंभीर जखमी झाले आहेत. सोबतच अनेक पाळीव जनावरांची देखील बिबट्याने शिकार केल्याच्या घटना सुरूच आहेत. त्यामुळे तात्काळ पुनर्वसन करावे अशी मागणी गावकऱ्यांनी रेटून धरली होती, आणि आता पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू झाल्याने गावकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.