नेशन न्यूज मराठी टीम.
ठाणे/प्रतिनिधी – ठाणे जिल्ह्यातील पिंपळास, वळ व दापोडे व या ग्रामपंचायतींच्या रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुका होणार असून दि. १८ एप्रिल २०२३ रोजी पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक काळातवरील ग्रामपंचायत हद्दीत तसेच निवडणूक प्रक्रिया होणाऱ्या ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात दि. 08 मे २०२३ ते २४ मे २०२३ या कालावधीत मनाई आदेश लागू करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी कळविली आहे.
या काळात ठाणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत शांतता व सुव्यवस्था राहण्यासाठी 2४ मे 2023 पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. यानुसार खाजगी जागेत विनापरवाना पोस्टर, झेंडे, बॅनर्स, कापडी फलक लावण्यास मनाई आहे, असे ठाणे शहर विशेष शाखेचे पोलीस उप आयुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी कळविले आहे.
ग्रामपंचायत निवडणूक काळात विविध राजकीय पक्ष प्रचारासाठी झेंडे उभारणे, बॅनर्स, कापडी फलक, पोस्टर्स लावणे, नोटीसा चिटकविणे, घोषणा लिहीणे, घोषणा देणे, कमान, पताका, कटआउट लावणे व चिन्हे वापरतात. त्यामुळे अनेक वेळा दोऱ्या, काठ्या व तत्सम भाग रस्त्यावर आडवा येऊन रहदारीस अडथळा होतो. प्रचाराचे कालावधीत अशा किरकोळ कारणावरून वाद निर्माण होऊन पक्ष कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाचे वातावरण तयार होते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून सार्वजनिक शांततेचा भंग होऊ शकतो. त्यामुळे ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीत ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था जोपासण्यासाठी मनाई आदेश लागू करण्यात आले असल्याची माहिती उप आयुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी दिली आहे.
या निवडणुकीच्या काळात कोणत्याही उमेदवाराने खाजगी इमारत अथवा आवारात पोस्टर, झेंडे, बॅनर्स, कापडी फलक लावणे, नोटीसा चिटकविणे, घोषणा लिहिणे इत्यादीचा वापर करावयाचा असल्यास त्यांनी प्रथम जागा मालकाची लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे. अशी लेखी परवानगी संबंधित पोलीस स्टेशनला दाखवून पोलीसांचा ना हरकत दाखला घेणे देखील बंधनकारक राहील. अशा रितीने खाजगी जागेवर लावलेले बॅनर्स, पोस्टर्स इत्यादीमुळे रहदारीस अडथळा होणार नाही, उजेड हवा अडवली जाणार नाही हे पाहणे त्या उमेदवाराला बंधनकारक राहिल. हा आदेश ठाणे पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ २ भिवंडी अंतर्गत कोनगाव पो.स्टे. हद्दीत पिंपळास, नारपोली पो.स्टे. हद्दीत वळ व दापोडे व या ग्रामपंचायतींच्या रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणूकांसाठी निवडणूक कार्यक्षेत्रात निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंतच्या कालावधीसाठी प्रतिबंध करीत आहे. हा मनाई आदेश दि. ०8 मे २०२३ रोजी 00.01 वा. पासून ते दि. 24 मे 2023 रोजी 24.00 वा. पर्यंत लागू राहिल. सदर मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३१ प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे उप आयुक्त डॉ. परोपकारी यांनी कळविले आहे.