नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी – मेल एक्स्प्रेसमध्ये प्रवाशाला मारहाण करत त्याचा मोबाईल हिसकावणाऱ्या चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. महेंद्र धुळधुळे असं या चोरट्याचं नाव आहे. मेल एक्स्प्रेसमधून प्रवास करताना मोबाईलवर बोलत असलेल्या प्रवाशाचा मोबाईल हिसकावून महेंद्र पळून गेला. मात्र प्रवाशाने मोठ्या धाडसाने पाठलाग करत त्याला पकडलं. याच दरम्यान चोरट्याने दिलेल्या धक्क्यामुळे प्रवाशाला दुखापत झाली. मात्र तरीही त्याने चोरट्याला सोडले नाही. ‘चोर.. चोर’ असा आरडाओरडा करताच ड्युटीवर असलेल्या आरपीएफच्या जवानांनी धाव घेत या चोरट्याला पकडून कल्याण रेल्वे पोलिसाच्या हवाली केलं.
अनिरुद्ध शर्मा २७ एप्रिल रोजी राजेंद्र प्रसाद पटना एक्सप्रेस या मेल गाडीने मुंबईच्या दिशेने येत होते. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ही गाडी कल्याण स्टेशनजवळ येत असताना शर्मा आपल्या जागेवर बसून मोबाईलवर बोलत होते. याच दरम्यान त्यांच्या समोरच्या सीटवर बसलेल्या एका तरुणाने त्यांच्या हातातील मोबाईल खेचून पळ काढला.
दरम्यान मात्र शर्मा यांनी त्या चोरट्याला झडप टाकत पकडले. चोरट्याने त्यांना धक्का दिल्याने शर्मा खाली पडले आणि त्यांना दुखापत झाली. मात्र तरीही त्यांनी चोरट्याला सोडलं नाही. अखेर गाडी कल्याण स्थानकात थांबताच त्याने गाडीच्या दुसऱ्या बाजूने उडी मारत पळण्याचा प्रयत्न केला. शर्मा यांनी त्याच्या मागे उडी मारत त्याला पकडलं. आरडाओरडा केल्याने याचवेळी ड्युटीवर असलेल्या आरपीएफ जवानांनी धाव घेत त्याला ताब्यात घेत पोलिसांच्या हवाली केले. त्याला पकडल्यानंतर माहिती मिळाली की, महेंद्र धूळधुळे असं या चोरट्याचे नाव असून तो ठाणे घोडबंदर परिसरातील रहिवासी आहे. रेल्वे पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याने अशा प्रकारचे किती गुन्हे केले आहेत याचा तपास कल्याण रेल्वे पोलीस करत आहेत. जर या चौकशीत आणखी काही माहिती मिळाली तर अन्य गुन्ह्यांचीही उकल होण्याची शक्यता आहे. तो अटल गुन्हेगार आहे का त्यावरुन त्याच्या तपासाची दिशा ठरणार आहे .