नेशन न्यूज मराठी टिम.
धुळे/प्रतिनिधी– धुळे शहरात गेले महिन्या भरापासून वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभार सुरू आहे. वारंवार खंडीत होणाऱ्या वीजपुरवठा विरोधात आज धुळ्यात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने तीव्र आंदोलन करीत रस्ता रोको करण्यात आला. धुळे शहरातील साक्री रोडवर असलेल्या वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयाबाहेर रास्ता रोको करून निषेध करण्यात आला. यावेळी काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
धुळे शहरासह परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने ४० अंशाहून अधिकच्या तापमानात धुळेकर नागरिक हवालदिल झाले आहे. वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
वेळोवेळी नागरिकांनी व सामाजिक संघटनांकडून वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी सांगण्यात आले होते, मात्र नागरिकांच्या या मागणीकडे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने आज संतप्त शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाबाहेर ठिय्या देत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.
सध्याच्या वाढत्या तापमानामुळे धुळेकर नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले असताना खंडीत वीज पुरवठ्यामुळे लहान बालके, वयोवृद्ध, व्यापारी प्रतिष्ठाणे, शासकीय कार्यालये एवढेच काय तर मनपाचा पाणी पुरवठा विभागही त्यामुळे हवालदिल झाले आहे. वीजेवर आधारित छोटे- मोठे व्यावसायिक, पॅावरलुम धारक चांगलेच हैराण झाले असुन त्यांना आर्थिक फटका बसत आहे.
या सर्व बाबींचा महावितरण कंपनीने गांभीर्याने विचार करून येत्या आठवडाभरात धुळे शहरातील विजेचे दुरुस्तीचे कामे युध्दपातळीवर पुर्ण करून वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठ्याच्या प्रश्नावर नागरीकांना दिलासा द्यावा, अन्यथा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने विद्युत वितरण कंपनी विरोधात मोठे जनआंदोलन छेडले जाईल व त्यातुन उपस्थित होणाऱ्या कायदा सुव्यवस्था प्रश्नावर सर्वस्वी अधिकारी जबाबदार राहतील, असा गंभीर इशारा या आंदोलना वेळी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांनी दिला आहे.
यावेळी उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, मा.आ.प्रा.शरद पाटील महानगरप्रमुख धीरज पाटील, डॉ. सुशील महाजन, हेमाताई हेमाडे, जयश्री वानखेडे, संघटक गुलाब माळी, भरत मोरे ,संदीप सुर्यवंशी, लखन चांगरे, अजय चौधरी आदी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.