नेशन न्यूज मराठी टीम.
नवी मुंबई/प्रतिनिधी – केंद्र सरकारने सर्वसाधारण सवलत अधिसूचनेद्वारे राष्ट्रीय धोरण 2021 अंतर्गत सूचीबद्ध सर्व दुर्धर आजारांबाबत विशेष वैद्यकीय चिकित्सा, वैयक्तिक उपचारासाठी आयात केल्या जाणाऱ्या सर्व औषधे आणि खाद्यान्नावरील सीमाशुल्कात पूर्णपणे सूट दिली आहे.
या सवलतीचा लाभ घेण्यासाठी, वैयक्तिक आयातदाराला केंद्रीय किंवा राज्याचे आरोग्य सेवा संचालक किंवा जिल्हा वैद्यकीय अधिकारी/सिव्हिल सर्जन यांचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. औषधांवर साधारणपणे 10% मूलभूत सीमा शुल्क आकारले जाते, तर काही जीवनरक्षक औषधे/ लस यांना 5% किंवा शून्य सवलतीच्या दर आकारला जातो.
पाठीच्या कण्यासंबंधित स्नायू विकार, स्पायनल मस्कुलर ऍट्रोफी किंवा स्नायू विकार, ड्यूशेन मस्कुलर डिस्ट्रॉफीच्या उपचारांसाठी निर्देशित औषधांना आधीच सूट प्रदान केली आहे. अशात, इतर दुर्धर रोगांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्या औषधांसाठी सीमाशुल्कात सवलत मिळावी यासाठी सरकारला अनेक निवेदने प्राप्त होत आहेत. या रोगांवरील औषधे किंवा विशेष अन्न, उपचार महाग असून ते आयात करणे आवश्यक आहे. काही दुर्धर आजारांमधे 10 किलो वजनाच्या बालकासाठी उपचारांचा वार्षिक खर्च 10 लाख ते 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकतो असा अंदाज आहे. औषधांची मात्रा आणि खर्च, वय तसेच वजनानुसार आजीवन वाढताच असतो.
या सवलतीमुळे रुग्णांच्या खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होईल आणि त्यांना दिलासा मिळेल.
सरकारने विविध कर्करोगाच्या उपचारात वापरल्या जाणार्या पेम्ब्रोलिझुमॅबला (कीट्रूडा) मूलभूत सीमा शुल्कातून पूर्णपणे सूट दिली आहे.