नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नागपूर/प्रतिनिधी – ओटीटी प्लॅटफॉर्म वर दाखवल्या जाणाऱ्या कार्यक्रमात, अश्लीलता आणि असभ्य भाषेच्या वाढत्या वापराबद्दल केंद्र सरकार गंभीर आहे, अशी माहीती केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी आज दिली. ओटीटी प्लॅटफॉर्म वर दाखवल्या जाणाऱ्या भडक आणि अश्लील कंटेंट विषयी बोलतांना त्यांनी हे ही स्पष्ट केले, “सर्जनशीलतेच्या नावाखाली जर कोणी असभ्य शिवीगाळ करत असेल तर ते सहन केले जाणार नाही. ओटीटी प्लॅटफॉर्मवर वाढती शिवीगाळ आणि अश्लील दृश्याविषयी येणाऱ्या तक्रारींबद्दल सरकार गंभीर आहे. जर यासाठी नियमात काही बदल करण्याची गरज भासली तर मंत्रालय त्या दिशेनेही विचार करेल.” नागपूरच्या पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते.
यंदाच्या स्वातंत्र्यदिनापर्यंत म्हणजे, 15 ऑगस्टपर्यंत, देशभरात 1,000 खेलो इंडिया केंद्रे सुरु केली जातील, असेही क्रीडा आणि युवा कल्याण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले. यापैकी, 945 केंद्रांना याधीच मंजूरी देण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.
पायाभूत सुविधा विकासाबद्दल त्यांनी सांगितलं की, यंदाच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा क्षेत्रात 10 लाख कोटी रुपयांची तरतूद, भांडवली गुंतवणूकीसाठी करण्यात आली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात, रेल्वेसाठीच्या आर्थिक तरतुदीतही 9 पट वाढ करण्यात आली आहे, असेही ते पुढे म्हणाले.
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी 79 हजार कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे.
या वर्षीच्या अर्थसंकल्पात 3,797 कोटी रुपये क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्रालयाला देण्यात आले आहेत, असेही ठाकूर यांनी सांगितले.
तसेच, खेलो इंडिया क्रीडास्पर्धांमध्ये नवनवीन विक्रम प्रस्थापित केले जात आहेत आणि देशात मोठ्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. खासदार क्रीडा महाकुंभ स्पर्धा आयोजित करून खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात येत आहे, असे ते पुढे म्हणाले.
खेळाडूंसाठी उपलब्ध असलेल्या सरकारी योजनांची माहिती देत ठाकूर म्हणाले, भारतीय क्रीडा प्राधिकरण, खेलो इंडिया केंद्र, टार्गेट ऑलिम्पिक पोडीयम योजना देशातल्या प्रतिभावान खेळाडूंना ऑलिम्पिक आणि आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी तयार करतात. देशात 23 राष्ट्रीय उत्कृष्ट केंद्रे आहेत, जिथे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. या केंद्रांत, राहण्या आणि जेवण्याच्या सुविधा उपलब्ध आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.