नेशन न्यूज मराठी टीम.
नवी मुंबई/प्रतिनिधी – विविध खेळांमधील खेळाडूंना अनेक प्रकारच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात नवी मुंबई महानगरपालिकेने सातत्य राखत नेहमीच पुढाकार घेतला असून कुस्तीसारख्या देशी खेळांनाही प्रोत्साहन दिले जात आहे याबद्दल समाधान व्यक्त करीत ऐरोली विधानसभा सदस्य आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबईमध्ये अनेक चांगले कुस्तीगीर असून त्यांच्या करिता पोषक वातावरण निर्मिती करण्याच्या दृष्टीने कुस्तीच्या पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देण्याच्या सूचना केल्या.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने घणसोली येथील नमुंमपा शाळा क्रमांक 76 व 105 या शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय नवी मुंबई महानगरपालिका केसरी राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाचे उपायुक्त सोमनाथ पोटरे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे वरिष्ठ उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, कुस्तीगीर परिषदेचे पदाधिकारी प्रा. श्रीराम पाटील, डॉ. तपन पाटील, विकास पाटील, सतीश म्हात्रे, दत्तात्रय दुबे, महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त संजय तायडे व क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शहरातील गुणवंत खेळाडूंना स्वतःच्या खेळाचे प्रदर्शन करता यावे तसेच त्यांना इतर जिल्ह्यातील, राज्यातील नामांकित खेळाडूंचा खेळ बघूनही एक प्रकारे खेळाचे अप्रत्यक्ष प्रशिक्षण मिळावे यादृष्टीने विविध क्रीडा स्पर्धांचे महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन केले जात असल्याची माहिती देत क्रीडा विभागाचे उपायुक्त सोमनाथ पोटरे यांनी राज्यभरातून आलेल्या विविध जिल्ह्यांच्या कुस्तीगीरांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, पुणे यांच्या मान्यतेने आणि ठाणे जिल्हा तालीम संघाच्या सहकार्याने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित या ‘नवी मुंबई महानगरपालिका केसरी राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा’ मध्ये 74 ते 100 किलो वजनी गटात राज्यस्तरीय महापालिका चषक रुपये एक लक्ष पारितोषिक रक्कमेसह प्रदान केला जाणार आहे. याशिवाय 55 ते 65 किलो वजनी गट राज्यस्तर युवक गट असून, 65 ते 73 किलो वजनी गट राज्यस्तरीय स्पर्धेकरिता खेळविला जाणार आहे. याशिवाय 55 ते 60 किलो वजनी गट कोकण विभागीय स्तरावरील असून 55 ते 65 किलो वजनी गट नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रस्तरावरील कुस्तीगीरांसाठी आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र स्तरावर 40 ते 50 किलो वजनी गट हा चौदा वर्षाआतील वजनी गट असेल .
या स्पर्धेचे आणखी विशेष म्हणजे समाजाच्या सर्व क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या महिला कुस्ती क्षेत्रातही आपले कर्तुत्व सिद्ध करत असून त्यादृष्टीने महिला कुस्तीगीरांकरता 50 ते 55 किलो वजनाचा कोकण विभागीय महिला गट आणि 55 ते 65 किलो वजनाचा राज्यस्तरीय महिला गट असणार आहे. प्रत्येक गटातील विजेत्यांना भरघोस पारितोषिके दिली जाणार असून या स्पर्धेत एकूण रुपये चार लाख रकमेहून अधिक पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत. या स्पर्धेत राज्यभरातील 250 हून अधिक कुस्तीगीर सहभागी झाले असून त्यांच्या अत्यंत चुरशीच्या कुस्त्या बघण्यासाठी घणसोलीसह नवी मुंबईतील इतरही भागातून तसेच ठाणे, रायगड जिल्ह्यासह राज्यातील इतर भागांतून कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. अशा भरगच्च उपस्थितीत या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा दिमाखदार पारितोषिक वितरण सोहळा रविवार, दि. 26 फेब्रुवारी 2023 रोजी, रात्री 7.30 वा. संपन्न होणार असून त्यापूर्वी लाखमोलाची अंतिम कुस्ती होणार आहे. तरी सकाळी 9 पासून सुरू होणाऱ्या या कुस्ती स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून राज्यभरातून आलेल्या कुस्तीगीरांचा उत्साह वाढवावा असे आवाहन क्रीडा विभागाचे उपायुक्त सोमनाथ पोटरे यांच्या वतीने करण्यात येत आहे.