नेशन न्यूज मराठी टीम.
नवी मुंबई/प्रतिनिधी – शिक्षण व्हिजन अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर दिला जात असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जात आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील पटसंख्या दरवर्षी 1 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी वाढत असल्याचे दिसून येत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळा इमारती या भव्यतम तसेच सर्व सुविधायुक्त असून प्रशस्त वर्गखोल्या व प्रसन्न वातावरणामुळे शिक्षणाची गोडी वाढत असल्याचे चित्र आहे.
यासोबतच महानगरपालिका शाळांमधील वातावरण अधिक सुरक्षित असावे यादृष्टीने महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळा इमारतींमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत असून सदर कामास सुरुवात झालेली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्राथमिक 79 आणि माध्यमिक 23 अशा शाळा असून 55 इमारतींमध्ये या शाळा कार्यान्वित आहेत. या शाळांमधील सुरक्षा व्यवस्था सक्षम होण्याच्या दृष्टीने सर्व शाळांचे निरीक्षण करून शाळा इमारतींनुसार सीसीटीव्ही यंत्रणेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
त्यास अनुसरून 55 शाळा इमारतींमध्ये अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे ठरविण्यात येऊन त्याच्या प्रत्यक्ष कार्यवाहीस सुरुवात झालेली आहे. यामध्ये हायडेफीनेशन कॅमेरे वापरण्यात येत असून 195 बुलेट कॅमेरे व 492 डोम कॅमेरे वापरले जात असल्याची माहिती शहर अभियंता संजय देसाई यांनी दिली. तसेच ही सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेची शाळा सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम होणार असून नवी मुंबई महानगरपालिका शाळेतील मुलांना अभ्यासासाठी सुरक्षित वातावरण उपलब्ध होणार असल्याचे सांगितले आहे.