नेशन न्यूज मराठी टीम.
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – डोंबिवली शहर व परिसरातील, शालेय विद्यार्थ्यांमधील क्रीडागुणांचे संवर्धन करणे आणि त्यांना उत्तेजन देणे ह्या उद्दिष्टाने दरवर्षी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट यांच्या वतीने “डोंबिवली ऑलिंपिक्स” हा स्पर्धात्मक सोहळा आयोजित केला जातो. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट ह्यांची खास ओळख म्हणून विख्यात असलेल्या ह्या सोहळ्यात अनेक शाळांमधून हजारो विद्यार्थी उत्साहाने सहभागी होतात.
यंदाच्या वर्षी, सदर क्रीडा महोत्सवाचे दिनांक १४ व १५ जानेवारी २०२३ ह्या दिवशी आयोजन करण्यात आलेले आहे. सदर सोहळ्याचे उदघाटन महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर कैलास जेठाणी ह्यांच्या शुभहस्ते शनिवार १४ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ठीक ०७.३० वाजता होणार आहे. आपल्या अंगीभूत क्रीडाकौशल्याचे प्रदर्शन करण्याच्या संधी प्राप्त करुन देण्याच्या हेतूने आयोजित ह्या सोहळ्यात, ५० हून अधिक शाळांमधून २,००० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. सदर सोहळ्यात, मैदानी क्रीडाप्रकार हे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या क्रीडांगणावर, तर बंदिस्त क्रीडाप्रकार हे रोटरी भवन येथे खेळवण्यात येतील.
“डोंबिवली ऑलिंपिक्स” ह्या क्रीडात्मक सोहळ्याला आपला स्वतःचा गौरवशाली इतिहास आहे – ज्यामध्ये डोंबिवलीमधील विविध शाळांद्वारे उमलत्या क्रीडापटूंचा शोध घेऊन त्यांना ह्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी पाठवण्यात येते. विद्यमान २०२३ साली, सदर क्रीडा-सोहळ्यामध्ये, ऍथलेटिक्स, खो-खो, कबड्डी, फुटबॉल, डॉजबॉल, लंगडी, शॉर्टपुट, लांब-उडी, बुद्धिबळ, कॅरम अशा विविध क्रीडाप्रकारांचा समावेश करण्यात आला असून, त्यांची मुले आणि मुली ह्यांच्या विविध वयोगटाप्रमाणे वर्गवारी करण्यात आली आहे. विजेत्यांसाठी सुवर्ण, रौप्य आणि ताम्रपदक असे पुरस्कार, तसेच सर्वोत्कृष्ट प्रथम आणि द्वितीय शाळांसाठी चषक प्रदान करण्यात येणार आहे.अशी माहिती विजय डुंबरे अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट यांनी दिली.
रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ह्या उपक्रमाविषयी बोलताना अध्यक्ष विजय डुंबरे ह्यांनी सांगितले की, महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या क्रीडाकौशल्याचे संवर्धन करण्याच्या, आणि त्याद्वारे, त्यांची जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धांसाठी तयारी करुन घेण्याच्या उद्दिष्टाने सदर उपक्रमाची संकल्पना प्रथम १९९४-९५ साली मांडण्यात आली.
डोंबिवली शहरातील अनेक शाळांमध्ये अजूनही विद्यार्थ्यांना क्रीडाप्रकारासाठी पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध नसून, सदर उपक्रमाद्वारे, विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या क्रीडाप्रकाराचे स्वप्न जोपासण्यासाठी आणि वास्तवात उतरवण्यासाठी सुयोग्य अशी संधी प्राप्त होते. अशा क्रीडास्पर्धांमधूनच, विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, सावधपणा, सांघिक कामगिरी, आत्मविश्वास आणि प्रतिकूल परिस्थितीतून पुन्हा उंचावून येण्याची क्षमता असे विविध कौशल्यगुण रुजवून ते वाढवण्यास हातभार लागतो. याद्वारे, भावनिक, गतिजन्य आणि अंतर्व्यक्तीय बुद्धिमत्तेचा विकास होण्यास मदत होते.
रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टच्या सामुदायिक प्रयत्नांच्या फलस्वरुप, डोंबिवली शहरामधून क्रीडापटूंना प्रेरणादायी ठरुन त्यांचा विकास व्हायला हातभार लागेल असा विश्वास आहे!
ह्या क्रीडासोहळ्यातील मूल्यमापन व परीक्षाप्रक्रिया ही अंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त निकषांवर आधारित असून, ती स्वतंत्र व निष्पक्ष व्यावसायिक परीक्षांकांद्वारे करण्यात येणार आहे. ह्या स्पर्धांमधील पंच आणि परीक्षक हे व्यावसायिक क्रीडाशिक्षक असून त्यांना संबंधित क्रीडाप्रकारात प्रदीर्घ व सखोल अनुभव आहे.