नेशन न्यूज मराठी टीम.
नवी मुंबई/प्रतिनिधी – महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात येणा-या इयत्ता पाचवीची पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि इयत्ता आठवीची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा यामध्ये याही वर्षी नवी मुंबई महानगरपालिकेच्या 60 विदयार्थ्यांनी शिष्यवृत्ती संपादन करीत उल्लेखनीय यश प्राप्त केलेले असून त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.
यंदा 31 जुलै 2022 रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती यामध्ये महानगरपालिकेच्या शाळांतून इयत्ता पाचवीचे 509 व इयत्ता आठवीचे 453 असे एकूण 1062 विदयार्थी शिष्यवृत्ती परीक्षेकरिता प्रविष्ट झाले होते. त्यामधून इयत्ता पाचवीच्या 49 व इयत्ता आठवीच्या 11 विदयार्थ्यांनी गुणवत्तेनुसार शिष्यवृत्ती पटकावित नवी मुंबई महानगरपालिका शाळांमधील शैक्षणिक गुणवत्तेचा उंचावलेला स्तर सिध्द केला आहे. या गुणवत्ता यादीत झळकलेल्या विदयार्थ्यांकरिता शिक्षण विभागामार्फत अभ्यास सहल आयोजित करण्यात येणार आहे तसेच त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी महानगरपालिकेच्या वतीने प्रति विदयार्थी रु. 600/- इतकी प्रतिमहा प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेतल्या जाणा-या प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसलेल्या सर्व विदयार्थ्यांचे शुल्क नमुंमपा शिक्षण विभागामार्फत अदा करण्यात येते. या परीक्षेकरिता मार्गदर्शन करणा-या शिक्षकांसाठीही नमुंमपा शिक्षण विभागातर्फे विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात येते. शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासक्रमावर आधारित पुस्तके, मार्गदर्शके तसेच सराव प्रश्नपत्रिका विदयार्थ्यांना महानगरपालिकेमार्फत उपलब्ध करुन देण्यात येतात. शिष्यवृत्ती परीक्षेकरिता विदयार्थ्यांची तयारी करुन घेण्यासाठी शाळांमधील शिक्षकांमार्फत अतिरिक्त जादा तासिकांचे नियोजन करण्यात आले. विदयार्थ्यांच्या शंकाचे निरसन करण्यांसाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांव्दारे मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्यात आले. त्यासोबतच शाळेतील शिक्षकांनीही विदयार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन केले.
यावर्षीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिकेच्या तसेच खाजगी शाळांतील पाचवीचे 1793 व आठवीचे 1459 असे एकूण 3252 विदयार्थी नवी मुंबईतून शिष्यवृत्ती परीक्षेस बसले होते. त्यामध्ये महानगरपालिकेच्या शाळांतून इयत्ता पाचवीचे 509 व इयत्ता आठवीचे 453 असे एकूण 1062 विदयार्थी शिष्यवृत्ती परीक्षेकरिता प्रविष्ट झाले होते. त्यात नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील इयत्ता पाचवीच्या 49 व इयत्ता आठवीच्या 11 अशा एकूण 60 विदयार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त केलेली असून त्यामध्ये नमुंमपा शाळा क्रमांक 42, घणसोली येथील सर्वाधिक म्हणजे इयत्ता पाचवीचे 24 व इयत्ता आठवीचे 8 असे एकूण 32 विदयाथी गुणवत्ता यादीत झळकले आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका शाळांचा शिष्यवृत्ती परीक्षेतील शाळानिहाय निकाल –
* नमुंमपा शाळा क्र. 42, घणसोली – 24 (पाचवी) / 8 (आठवी)
* नमुंमपा शाळा क्र. 55, कातकरीपाडा – 10 (पाचवी) * नमुंमपा शाळा क्र.35, कोपरखैरणे – 01 (पाचवी)* नमुंमपा शाळा क्र.29, जुहूगांव – 01 (पाचवी)
* नमुंमपा शाळा क्र. 92, कुकशेत (इंग्रजी) – 01 (पाचवी)
* नमुंमपा शाळा क्र.91, दिवा ऐरोली (इंग्रजी) – 02 (पाचवी) / 01 (आठवी)
* नमुंमपा शाळा क्र.74, कोपरखैरणे (हिंदी) – 01 (पाचवी) / 02 (आठवी)
* नमुंमपा शाळा क्र.76, घणसोली (हिंदी) – 01 (पाचवी)
* नमुंमपा शाळा क्र.31, कोपरखैरणे – 01 (पाचवी)
* नमुंमपा शाळा क्र. 39, हनुमाननगर, महापे – 01 (पाचवी)
* नमुंमपा शाळा क्र. 20, तुर्भेगांव – 01 (पाचवी)
* नमुंमपा शाळा क्र.10 – नेरुळगांव – 01 (पाचवी)
* नमुंमपा शाळा क्र.36, कोपरखैरणे गांव – 04 (पाचवी)
* एकूण : 49 (पाचवी) / 11 (आठवी) = 60 (एकूण)
नवी मुंबई महानगरपालिका शाळांत शिकणारे विदयार्थी परिस्थितीमुळे मागे पडू नयेत यादृष्टीने त्यांच्या गुणवत्ता विकासाकरिता महानगरपालिकेच्या वतीने उच्चतम दर्जाच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात असून त्याचीच परिणिती म्हणजे नमुंमपा शाळांतील 60 विदयार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवता यादीत स्थान पटकाविले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण व्हिजनचे हे यश असून नवी मुंबई महानगरपालिकेचा नावलौकिक उंचाविल्याबद्दल महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी शिक्षण विभागासह सर्व शिष्यवृत्तीधारक विदयार्थी व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.