नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 27 डिसेंबर 2022 रोजी हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत (एसव्हीपीएनपीए) झालेल्या कार्यक्रमामध्ये भारतीय पोलीस दलातील प्रशिक्षणार्थींच्या 74 व्या तुकडीला संबोधित केले.
भारतीय पोलीस दलातील प्रशिक्षणार्थींना संबोधित करताना, राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, पोलीस दल ही सरकारची सर्वाधिक दृश्य यंत्रणा आहे. जेव्हा पोलीस दल जनतेचा विश्वास संपादन करते तेव्हा त्यातून सरकारची प्रतिमा अधिक उज्ज्वल होत असते. आणि जेव्हा अधिकाऱ्यांपासून अगदी शेवटच्या हवालदारापर्यंत संपूर्ण पोलीस दल सावधानता, संवेदनशीलता आणि प्रामाणिकपणा यांचे दर्शन घडविते तेव्हाच त्या पोलीस दलाला सामान्य जनतेकडून सन्मान आणि विश्वास मिळतो असे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की कारकीर्दीच्या सुरुवातीपासूनच भारतीय पोलीस दलातील प्रशिक्षणार्थींनी नेतृत्वगुण जोपासले पाहिजेत.
या प्रशिक्षणार्थींनी भारतीय पोलीस दलाच्या अखंडता, निःपक्षपातीपणा, धैर्य, स्पर्धात्मकता आणि संवेदनशीलता या पाच मूलभूत गुणांची आठवण ठेवावी आणि कृतीतून त्यांचे दर्शन घडवावे असा सल्ला राष्ट्रपतींनी दिला.
समाजात ज्यांच्या मताला फारसे महत्त्व नाही अशांच्या दुरवस्थेबाबत अधिक संवेदनशील राहण्याचा सल्ला त्यांनी प्रशिक्षणार्थींना दिला. त्या म्हणाल्या की, देशाच्या अत्यंत दुर्गम कोपऱ्यात राहणाऱ्या अशिक्षित, गरीब माणसाला तेथील स्थानिक पोलीस ठाण्याकडून सहानुभूतीपूर्वक मदत मिळेल याची सुनिश्चिती पोलीस अधिकाऱ्यांनी करून घेतली पाहिजे. पोलीस दलाची अशी जरब हवी की पोलिसांचा विचार मनात येताच गुन्हेगारांचा भीतीने थरकाप झाला पाहिजे. त्याच वेळी, सर्वसामान्य नागरिकाने मात्र पोलिसांकडे एक मित्र आणि रक्षणकर्ता म्हणून पाहिले पाहिजे अशी अपेक्षा राष्ट्रपती मुर्मू यांनी व्यक्त केली.
आपल्या राष्ट्रीय प्राधान्यक्रमांच्या धर्तीवर, अमृत काळात आपण स्वतःसाठी निश्चित केलेल्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यात नारी शक्तीला खूप महत्त्वाची भूमिका बजावावी लागणार आहे असे त्यांनी सांगितले.त्या म्हणाल्या की, महिलांच्या मोठ्या प्रमाणातील सहभागामुळे अधिक उत्तम प्रकारे समग्र विकास साधता येतो. आपण आता महिला सक्षमीकरणाच्या टप्प्याकडून महिलांच्या नेतृत्वाखाली विकास घडविण्याकडे वेगाने मार्गक्रमण केले पाहिजे अशी अपेक्षा राष्ट्रपती मुर्मू यांनी व्यक्त केली.