नेशन न्यूज मराठी टीम.
नवी मुंबई/प्रतिनिधी – नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गोवर – रुबेला आजारावरील नियंत्रणाकरिता नवी मुंबई महानगरपालिकेने नियोजनबध्द पावले उचलली असून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली डिसेंबर व जानेवारी महिन्यात विशेष लसीकरण मोहीम आयोजित करण्यात येत आहे. याबाबत आखणी करण्याकरिता वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लसीकरण टास्क फोर्स समितीची सभा घेण्यात आली.
याप्रसंगी टास्क फोर्सचे सदस्य असलेले बालरोगतज्ज्ञ, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी, नमुंमपा रुग्णालयांचे वैद्यकीय अधिक्षक व सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय आऱोग्य अधिकारी उपस्थित होते. या सभेमध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. अरूण काटकर यांनी गोवर रुबेला दुरीकरण कऱण्याकरिता गोवर आजार, शाळांमार्फत करावयाच्या उपाययोजना, केंद्रीय समितीच्या भेटी व शिफारशी याबाबत सादरीकरणाव्दारे माहिती दिली. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रविण कटके यांनी गोवर रुबेला आजारबाबत नवी मुंबईतील सद्यस्थिती आणि विशेष लसीकरण मोहिमेची माहिती दिली.
नमुंमपा क्षेत्रात नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात 2 पेक्षा अधिक रुग्ण आढळलेले 18 उद्रेक असून त्यातील 3 उद्रेक बंद करण्यात आले आहेत. तसेच उर्वरित 15 उद्रेकांपैकी 5 गोवर उद्रेक म्हणून घोषित करण्यात येऊन त्याठिकाणी अतिरिक्त डोस व झिरो डोस याबबाबतची प्रतिबंधात्मक कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे. गोवर प्रतिबंधाकरिता 9 महिने ते 5 वर्ष वयोगटातील लसीकरण न झालेल्या बालकांचे लसीकरण करण्याकरिता विशेष गोवर रुबेला लसीकरण अभियान शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात येणार असून 4 आठवड्याच्या अंतराने 2 मोहीमा घेऊन 26 जानेवारी 2023 पर्यंत या मुलांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवण्यात आले आहे. या मोहीमेअंतर्गत उद्रेक नसलेल्या कार्यक्षेत्रात वंचित गोवर रुबेला डोस पहिला व दुसरा पूर्ण करण्यात येणार आहे.
तसेच गोवर आजार उद्रेकग्रस्त भागात अतिरिक्त गोवर रुबेला डोस देण्यात येणार आहे. या विशेष गोवर रुबेला लसीकरण मोहीमेची पहिली फेरी 15 डिसेंबर ते 25 डिसेंबर 2022 या कालावधीत तसेच दुसरी फेरी 15 जानेवारी ते 25 जानेवारी 2023 या कालावधीत आरोग्य विभागाच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. या मोहीमेअंतर्गत महानगरपालिका क्षेत्रात 232 अतिरिक्त लसीकरण सत्रांचे नियोजन करण्यात आले असून 628 बालकांना पहिला डोस व 618 बालकांना दुसरा डोस अशा प्रकारे 1246 बालकांना प्राप्त सूचीप्रमाणे लसीकरण करणेबाबत टास्क फोर्सच्या बैठकीत कृती आराखडा सादर करण्यात आला. सदर विशेष गोवर रुबेला लसीकरण मोहीमेची व्यापक प्रसिध्दी विविध माध्यमांतून करण्याचे टास्क फोर्स सदस्यांमार्फत सूचित करण्यात आले असून त्यानुसार आरोग्य विभागामार्फत प्रचार प्रसिध्दी केली जात आहे. तरी 9 महिने ते 5 वर्षे वयोगटातील बालकांचे त्यांच्या पालकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने कऱण्यात येत आहे.