नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण पुर्वेतील नागरीकांची सर्वात मोठी समस्या असलेल्या लोकग्राम पादचारी पुलाचे काम लवकरात लवकर होऊन नागरकांची जटील समस्या सुटावी यासाठी आम आदमी पक्षाच्या वतीने स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली असुन सह्याच्यां माध्यमातून जनतेचा संताप व्यक्त होत आहे.
मार्च २०१९ मध्ये आयआयटीमुंबईच्या ऑडिट रिपोर्टच्या आधारे मध्य रेल्वेने २८ वर्ष जुना पूल असुरक्षित घोषित केल्यानंतर तो बंद केला होता. कल्याण पूर्व येथील हा लोकग्राम गृहसंकुल ते कल्याण स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक सात जोडणारा एकमेव पूल बंद झाल्याने लोकग्राम, मलंगगड, पिसवली, चक्की नाका आदी भागातील एक लाखांहून अधिक पादचार्याना कल्याण स्थानकात जाण्यासाठी सिद्धार्थ नगरच्या पुलाचा वापर करावा लागत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
३० डिसेंबर २०१९ रोजी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत या लोकग्राम पुलासाठी ३९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. तीन वर्षे होऊन सुद्धा या पुलाच्या कामाला सुरवात झाली नसल्याने या परिसरातील नागरिकांनी हा पूल लवकर सुरु करण्याबाबत आम आदमी पार्टीकडे तक्रारी केल्या होत्या. नागरिकांच्या या तक्रारी लक्षात घेऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी लोकग्राम पूलाच्या परिसरात सह्यांची मोहीम घेतली. या मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभल्याची माहिती कल्याण डोंबिवली शहर उपाध्यक्ष रवी केदारे यांनी दिली.