नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – दोन वर्ष करोना प्रतिबंधामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या सर्वसामान्य चाकारमान्यांना यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त आणि उत्साहाने साजरा करता यावा, यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कोकण, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये तब्बल ३५० मोफत बस उपलब्ध करून दिल्या होत्या. नुकतेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या बसला भगवा झेंडा दाखवत मार्गस्थ केले. कल्याण लोकसभा मतदारसंघातील दिवा, कळवा, डोंबिवली, कल्याण ग्रामीण, कल्याण पूर्व, उल्हासनगर आणि अंबरनाथ शहरातील सुमारे 15 हजार चाकरमानी आणि प्रवाशांना याचा थेट फायदा झाला. गणेश भक्तांनी या उपक्रमाबद्दल डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले.
डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुलात रविवारी अनोखा सोहळा रंगला. हा सोहळा होता रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमधील गणेशोत्सवासाठी घरी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासाचा. गेली दोन वर्षे करोना संकट असल्याने हिंदू सणांवर तत्कालीन सरकारने निर्बंध आणले होते. या निर्बंधांमध्येच सण साजरे करण्याची वेळ भक्तांवर आली होती. मात्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाल्यानंतर राज्यातील सर्व सण – उत्सव निर्बंध मुक्त करण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्रातला सर्वात मोठा सण असलेल्या गणेशोत्सवावरचे सर्व निर्बंध हटले होते.
कोकणातील गणेशोत्सवाची वेगळी परंपरा आहे. त्यासह सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातही हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या उत्सवासाठी मुंबई, उपनगर, ठाणे जिल्ह्यातील दिवा, कळवा, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथ अशा शहरांमधून हजारो चाकरमानी गणेशोत्सवासाठी आपल्या मूळ गावी जातात. अनेकदा चाकरमान्यांना महागडा आणि खर्चिक प्रवास करावा लागतो. रेल्वेचे तिकीट, बसचे तिकीट न मिळाल्याने अनेकांना आपल्या उत्साहावर पाणी सोडण्याची वेळ येते. यंदाचा उत्सव निर्बंधमुक्त असल्याने या उत्सवाबद्दल सर्वत्र उत्सुकता होती. सर्वसामान्य चाकरमानी गणेश भक्तांच्या या उत्साहाला कायम राखण्यासाठी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या 350 बस मोफत उपलब्ध करून दिल्या होत्या. कळवा, दिवा, डोंबिवली, कल्याण ग्रामीण, कल्याण पूर्व, उल्हासनगर आणि अंबरनाथ शहरातून रविवारी या बस सोडण्यात आल्या.
डोंबिवलीच्या पी. सावळाराम क्रीडा संकुलात चाकरमान्यांच्या बस मार्गस्थ करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुमारे दीडशे बस उपलब्ध होत्या. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील चाकरमान्यांनी या बसचा आधार घेतला. पी. सावळाराम क्रीडा संकुलात या बस मार्गस्थ करण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे स्वतः उपस्थित होते. याप्रसंगी या बसचे सारथ्य करणाऱ्या बस चालक आणि वाहकांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी डोंबिवली शहर शिवसेनेचे पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. खासदार श्रीकांत शिंदे यांनी बस चालक आणि वाहकांचा गौरव करत कौतुक केले. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना लवकरच मार्गी लावले जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिले. शिवसेना कोकणवासी यांच्या कायमच पाठी उभी राहिली आहे. कोकणवासी यांनीही शिवसेनेला भरभरून दिले. यावेळी गणेशभक्तांना डॉ. शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अनेक चाकरमानी गणेशभक्त भावुक झाले होते.