नेशन न्युज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली/प्रतिनिधी– केंद्रीय दूरसंवाद मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज एका कार्यक्रमात भारतीय टेलिग्राफ राईट ऑफ वे नियम 2016 मधील सुधारणा जारी केल्या. राईट ऑफ वे अर्थात दूरसंवाद टॉवर्स उभारणे , ऑप्टिकल फायबर्स केबल टाकणे इत्यादीसाठीच्या ढाच्यात सुधारणा केल्यामुळे दूरसंवाद पायाभूत सुविधा वेगाने आणि सुलभरित्या तैनात करणे शक्य होईल. भारतात 5G चे जलद कार्यान्वयन व्हावे यासाठी, गतिशक्ती संचार पोर्टलवर नव्या 5G राईट ऑफ वे अर्जदेखील जारी करण्यात आले. डीसीसीचे अध्यक्ष आणि सचिव (दूरसंचार )के राजारामन, दूरसंचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
आपल्या भाषणात,अश्विनी वैष्णव यांनी देशभरात 5G सेवांचे जलद कार्यान्वयन सुनिश्चित करण्यासाठी 4 मूलभूत घटकांचा उल्लेख केला. यात प्रामुख्याने स्पेक्ट्रमचे वाटप, राईट ऑफ वे परवानगी प्रक्रियेत सुधारणा, सहकारी संघराज्य आणि सेवांची अंमलबजावणी यांचा उल्लेख केला. स्पेक्ट्रम वाटप यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. एकात्मिक पद्धतीने पायाभूत सुविधांच्या विकासाच्या माननीय पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाच्या अनुषंगाने दूरसंवाद विभागाने मे 2022 मध्ये गतिशक्ती संचार पोर्टल सुरू केले.