नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
मणिपूर – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 19 ऑगस्ट 2022 रोजी मणिपूरमधील मंत्रीपुखरी इथल्या आसाम रायफल्सच्या (दक्षिण) महानिरीक्षक मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी रेड शील्ड डिव्हिजन आणि आसाम रायफल्सच्या जवानांशी संवाद साधला. त्यांच्यासोबत लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, जीओसी-इन-सी इस्टर्न कमांड लेफ्टनंट जनरल आरपी कलिता आणि जीओसी स्पीअर कॉर्प्स लेफ्टनंट जनरल आर सी तिवारी यांच्यासह लष्कर आणि आसाम रायफल्सचे इतर वरिष्ठ अधिकारी होते. प्रदेशात स्थिरता आणि शांतता राखण्यासाठी भारत-म्यानमार सीमेवरील बंडखोरविरोधी कारवाई तसेच सीमा व्यवस्थापनाबाबत यावेळी संरक्षण मंत्र्यांना माहिती देण्यात आली.
भौगोलिक आणि हवामान विषयक आव्हाने तसेच मणिपूरमधील सुरक्षा परिस्थिती सुधारण्यासाठी संकटांना न जुमानता धैर्याने आणि आत्मविश्वासाने कर्तव्य बजावल्याबद्दल अधिकारी आणि सैनिकांचे राजनाथ सिंह यांनी कौतुक केले. भारतीय लष्कर आणि आसाम रायफल्सच्या तुकड्यांसोबत असणे ही अभिमानाची बाब आहे, असे ते म्हणाले.
रेड शील्ड डिव्हिजनची स्थापना झाल्यापासून 1971 चे युद्ध, श्रीलंकेतील आयपीकेएफ मधील सहभाग किंवा सध्याची महत्वाची कामगिरी याबद्दल संरक्षण मंत्र्यांनी त्यांच्या योगदानाचे कौतुक केले. गेल्या सात दशकांत आसाम रायफल्सने उत्कृष्ट भूमिका बजावली आहे. अंतर्गत सुरक्षेमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे, भारत-म्यानमार सीमा सुरक्षित करण्यात आणि ईशान्य प्रदेशाला राष्ट्रीय मुख्य प्रवाहात आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका वठवली असल्याचे सांगत त्यांनी आसाम रायफल्सची प्रशंसा केली. “याचमुळे, तुम्हाला ‘ईशान्येतील लोकांचे मित्र’ आणि ‘ईशान्येचे रक्षक’ म्हटले जाते,” असे ते म्हणाले.
आपल्या समर्पणाने राष्ट्रध्वज सतत उंच फडकत ठेवण्याचे आवाहन राजनाथ सिंह यांनी जवानांना केले. सीमा सुरक्षित असेल तेव्हाच राष्ट्र आपल्या पूर्ण क्षमता प्राप्त करू शकते असे ते म्हणाले. रेड शील्ड डिव्हिजन आणि आसाम रायफल्सच्या 1,000 हून अधिक जवानांनी या संवादात भाग घेतला .