नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण – भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाचे औचित्य साधून आझादी का अमृत महोत्सव देशभर साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने केंद्र शासनाने पथविक्रेते व त्यांच्या कुटुंबासाठी स्वनिधी महोत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे. केंद्र शासनाद्वारे यासाठी देशभरातील ७५ शहरांची निवड केलेली असून त्यामध्ये कल्याण डोंबिवली शहराचा समावेश आहे.
या योजनेतंर्गत पीएम स्वनिधी योजनेतील लाभार्थ्यांचे व त्यांच्या कुटूंबाचे सामाजिक – आर्थिक सर्वेक्षण करुन पात्रतेनुसार शासनाच्या योजनांचा लाभ देण्यात येत आहे. त्यानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिके मार्फत पीएम स्वनिधी योजनेमध्ये समाविष्ट असलेले पथविक्रेते तसेच उर्वरित पथविक्रेत्यांसाठी २३ जुलै रोजी सावित्रीबाई फुले कलामंदिर, डोंबिवली येथे दु. ३ ते रात्री ८ या वेळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये पथविक्रेत्यांचे ३० व बचतगटातील १० असे एकूण ४० स्टॉल लावण्यात येणार आहेत तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे.
या कार्यक्रमाकरीता मुख्यमंत्री प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन उपस्थित राहणार आहेत. तसेच केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज कपिल पाटील, त्याचप्रमाणे इतर मान्यवरही प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत.