नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण – कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तपदी राज्य शासनाकडून डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या जागी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे (आय ए एस) यांची आज नियुक्ती करण्यात आली. आज संध्याकाळी राज्य शासनाकडून याबाबतचे आदेश जारी करण्यात आले.
केडीएमसीचे मावळते आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या कामांमुळे त्यांची कारकीर्द लक्षवेधी अशी ठरली. आयुक्तपद स्विकारल्याच्या पहिल्या दिवसापासून त्यांनी आपल्या लोकाभिमुख कामाची चुणूक दाखवून दिली. कोवीड काळात तर अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी केलेल्या कामाची दखल केंद्र सरकारलाही घेण्यास भाग पडले. कोवीड काळ असूनही कल्याण डोंबिवलीतील विकासाच्या दृष्टीने अनेक वर्षे रखडलेल्या विविध विकासकामांना त्यांनी केवळ गतीच दिली नाही, तर कित्येक कामे पूर्णत्वासही नेली. विशेष म्हणजे कल्याण डोंबिवलीकरांच्या मनामध्ये केडीएमसी प्रशासनाबाबत निर्माण झालेला अविश्वास आणि नकारात्मक छबी बदलण्यात डॉ. विजय सुर्यवंशी यांचा मोलाचा वाट आहे . तसेच पूर्वी वेगवेगळ्या दिशेला तोंड असणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांनाही त्यांनी आपल्या कार्यशैलीच्या बळावर एकत्र आणत त्यांच्यामध्ये शहरांबाबत आपुलकी निर्माण केली.
तर नवनियुक्त आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनीही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आपल्या कामाची छाप पाडली आहे. अनेकविध योजना आणि प्रकल्पांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचा कारभार ग्रामीण भागामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीला विकासाच्या मार्गावर नेतील आणि सामान्य नागरिकांना न्याय देतील अशी अपेक्षा त्यांच्या कडून आहे.