कल्याण – महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज नवीन अद्यायवत ई-गव्हर्नन्स प्रणालीतील वेब साईटचे सॉफ्ट लाँच ऑनलाईन स्वरुपात केले. त्यामुळे महापालिकेमार्फत दिल्या जाणा-या सेवा आता एका क्लिकमध्ये (ऑनलाईन स्वरुपात) नागरिकांना उपलब्ध होणार आहेत.यामुळे नागरिकांची वेळेची बचत होणार आहे.घर बसल्या विविध सेवांचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे.
महापालिकेची सन 2002 मध्ये सुरु झालेली ई-गव्हर्नन्स प्रणाली आता कालबाहय झाल्यामुळे एसकेडीसीएल मार्फत आज अत्याधुनिक अशी नविन तंत्रज्ञानावर आधारित ई-गव्हर्नन्स प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. यामध्ये मालमत्ता कर, पाणी पट्टी कर, जन्म मृत्यू प्रमाणपत्र, लायसन्स फी, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, तक्रार निवारण सेवा इ. सेवा नागरिकांना घर बसल्या उपलब्ध होणार आहेत.
सध्याच्या धावपळीच्या धकाधकीच्या काळात आपला मालमत्ता कर, पाणी पट्टी कर याच्या रकमा महापालिकेच्या संकेतस्थळावर त्वरीत उपलब्ध होवून महापालिकेच्या कुठल्याही कार्यालयात प्रत्यक्ष न येताही भरता येणार आहेत. त्यामुळे नागरिकांचा कर भरणा करणेकामी महापालिकेत येण्यासाठी लागणारा वेळ व त्यासाठी होणारी दगदग वाचणार आहे. नागरिकांनी स्वत: ऑनलाईन स्वरुपात कर भरणा केल्यामुळे कराच्या थकबाकीचे प्रमाणही कमी राहण्याची शक्यता आहे. आज सदर प्रणाली कार्यान्वित होताच सुमारे 90 लाखाचा कर भरणा करुन नागरिकांनी महापालिकेच्या ई-गव्हर्नन्स प्रणालीला उस्त्फुर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.
या वेळी एसकेडीसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रल्हाद रोडे व आयटी मॅनेजर प्रशांत भगत उपस्थितीत होते.