नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
जळगाव – खानदेशातील महत्त्वपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या विकासाला आधुनिक रस्त्यांची जोड देण्यासाठी आज जळगाव येथे 2,460 कोटी रुपये किंमतीच्या 16 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याचे मंत्री व जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेश पाटील, रक्षा खडसे, महापौर जयश्री महाजन तसेच इतर आमदार व अधिकारी यांच्या उपस्थितीत लोकार्पण व भूमिपूजन केले.
केळी, कापूस व ऊस उत्पादनासाठीचे महत्त्वाचे केंद्र असणारा व देशातील सर्वाधिक केळी उत्पादन असलेल्या जळगाव जिल्ह्यासाठी शेतीमालाची वाहतूक व दळणवळणाच्या दृष्टीने रस्ते कनेक्टिव्हिटी महत्त्वाची असल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील या रस्ते प्रकल्पांमुळे गुजरात, महाराष्ट्र, ओडिसा, छत्तीसगढ या राज्यांची कनेक्टिव्हिटी सुधारेल. मुक्ताईनगर, वरणगाव, नशीराबाद, जळगाव शहरांतील वाहनांची रहदारी कमी होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.
या प्रकल्पांमुळे वाहतुकीला गती मिळून इंधन व वेळेची बचत होईल. जळगाव शहरातील ट्रॅफिक जाम तसेच अपघात कमी होण्यास मदत होईल. सिमेंट-काँक्रिटच्या या रस्त्यांमुळे खड्ड्यांपासून मुक्तता मिळेल. जवळील ग्रामीण भागाशी कनेक्टिव्हिटी सुधारेल तसेच या प्रकल्पांतर्गत असलेल्या पुलांच्या निर्माणामुळे नागरिकांचा प्रवास सुकर व सुरक्षित होईल,असे गडकरी यांनी यावेळी सांगितले.