नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली – संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारी 2022 रोजी सुरू झाले होते, ते आज, गुरूवार, 7 एप्रिल 2022 रोजी संस्थगित करण्यात आले. नवी दिल्ली येथे अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत बोलताना आज केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की संपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात राज्यसभा आणि लोकसभेच्या 27 बैठका झाल्या. मंत्र्यांनी अधोरेखित केले की हे अधिवेशन, 8 एप्रिल 2022 पर्यंत चालणार होते, मात्र विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या मागणीमुळे ते आज संस्थगित करण्यात आले.
संसदीय कामकाज आणि सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि संसदीय कामकाज आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन हे देखील पत्रकार परिषदेत उपस्थित होते. 2022-23 वर्षासाठी मंगळवार, 1 फेब्रुवारी,रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अधिवेशनाच्या पहिल्या भागात दोन्ही सभागृहात केंद्रीय अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा झाली. नियोजित 12 तासांऐवजी लोकसभेचे कामकाज 15 तास 35 मिनिटे चालले आणि राज्यसभेचे कामकाज 11 तास 01 मिनिट चालले.
या अधिवेशनात एकूण 13 विधेयके (लोकसभेत 12 आणि राज्यसभेत 1) मांडण्यात आली. लोकसभेने 13 विधेयके आणि राज्यसभेने 11 विधेयके मंजूर केली. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेल्या विधेयकांची एकूण संख्या 11 आहे.
2022 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान लोकसभेत 129% तर राज्यसभेत 98% कामकाज झाले.