नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – देशाच्या सागरी सुरक्षेसाठी तटरक्षक दल नेहमीच तत्पर असतात. त्यांचे समुद्रातील प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष्य असते. त्यामुळे तस्करी करणाऱ्या अनेक टोळ्या आजवर जेरबंद झाल्या आहेत. यावेळी एटीएस आणि एनसीबी यांनी मोठी कामगिरी केली आहे. त्यांनी तब्बल 600 कोटी रुपयांचे ड्रग्स नेणारी नाव ताब्यात घेतली आहे.
भारतीय तटरक्षक दलाने दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि अमली पदार्थ नियंत्रण संस्थेच्या (एनसीबी) सहयोगाने 28 एप्रिल 2024 रोजी नियोजनपूर्वक आखलेल्या कारवाईत एका पाकिस्तानी नावेवरून 600 कोटी रुपये किमतीचे 86 किलो अमली पदार्थ जप्त केले आणि नावेवरून 14 जणांना ताब्यात घेतले. शोध यंत्रणेला चुकवून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या संशयित बोटीचा, भारतीय तटरक्षक दलाच्या राजरतन या सुसज्ज जहाजावरील एटीएस आणि एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी छडा लावला. राजरतन जहाजाने, जहाजांचा ताफा आणि विमानाच्या मदतीने, अमली पदार्थांनी भरलेल्या या जहाजाला निसटण्याची कोणतीही संधी मिळू दिली नाही. जहाजावरील विशेष पथकाने संशयित बोटीचा ताबा घेतला. त्यानंतर कसून तपासणी केल्यावर नावेत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ असल्याचे आढळून आले. पुढील तपास आणि कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
भारतीय तटरक्षक दल आणि दहशतवादविरोधी पथकाने एकत्र येऊन गेल्या तीन वर्षांत अशा प्रकारच्या अकरा यशस्वी मोहिमा राबवल्या असून, यामधून राष्ट्रीय उद्दिष्टांप्रति त्यांच्यामध्ये असलेला समन्वय दिसून येत आहे. त्यामुळेच भारतातील सागरी किनारपट्टीवर होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसू शकला आहे.