नेशन न्यूज मराठी टीम.
सोलापूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत बोलताना कोरोना काळातील आपल्या अपयशाचे खापर काँग्रेसवर फोडत कोरोना वाढीस महाराष्ट्र जबाबदार आहे असे खोटे बोलून महाराष्ट्राचा अपमान केला. पंतप्रधानांच्या या वक्तव्याचा निषेधार्थ सोलापूर शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने कॉंग्रेस भवन सोलापूर येथे शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेत्रत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राची माफी मागावी, मोदी सरकार शर्म करो, असे जोरजोरात घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला.
काँग्रेस शहर अध्यक्ष प्रकाश वाले म्हणाले की, कोरोना प्रादुर्भाववाढीच्या सुरुवातीला प्रचारजीवी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी च्या पहिल्या आठवड्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडून सुद्धा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात लाखो लोक, त्यात हजारो परदेशी लोक जमवून नमस्ते ट्रम्प कार्यक्रम केला तिथूनच भारतात कोरोना वाढला, मोदी आणि भाजपच्या वतीने याच काळात मध्यप्रदेशात सत्तापालट खेळ खेळला गेला. बिहार व इतर राज्यात मोठमोठ्या रॅली व प्रचार सभा घेण्यात आल्या. राहुल गांधींनी कोरोना अती धोकादायक आहे उपाययोजना करा म्हणून सांगितले पण त्यावेळी भाजप नेत्यांकडून त्यांची चेष्टा करण्यात आली मोदी सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे काळजी न घेतल्यामुळे लाखो लोकांच्या मृत्यू कोरोनामुळे झाल्याची झाल्याचे टीकाही त्यांनी केली
महाराष्ट्रातील कॉंग्रेस पक्ष त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते स्थलांतरित मजुरांना, नागरिकांना रेल्वे तिकीट, जेवण व इतर प्रकारे मदत करत होते तेव्हा भाजपवाले पीएम केयर फंडसाठी पैसे मागत होते हा इतिहास कोणीही विसरणार नाही पंतप्रधान मोदी यांना महाराष्ट्राबद्दल आकस आहे. ते नेहमीच महाराष्ट्राचा तिरस्कार करतात. मोदीजी आपण सात वर्षे सत्तेवर आहात, रेल्वे तुमच्या अखत्यारीत आहे. विमानतळ बंद केले नाही याउलट कोरोना वाढीस महाराष्ट्र कारणीभूत आहे असे संसदेत आरोप करून महाराष्ट्राचा अपमान केल्याबद्दल मोदींनी माफी मागावी अशी मागणी सोलापूर काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली.