नेशन न्यूज मराठी टीम.
डोंबिवली – केडीएमसीच्या प्रभाग रचनेवरून मनसेपाठोपाठ आता भाजपनेही शिवसेनेवर टीकास्त्र डागले आहे. आपले अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रशासनाला हाताशी धरून शिवसेनेने केलेला हा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीका भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी केली आहे. यावेळी चव्हाण यांनी प्रभाग रचना, 27 गावं, प्रशासन, भूमिपुत्र यांसह शिवसेनेच्या हिंदुत्ववादी विचारांवरही भाष्य करत जोरदार हल्ला चढवला.
आगामी केडीएमसी निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना मंगळवारी 1 फेब्रुवारी रोजी जाहीर झाली. त्यापाठोपाठ निवडणूक प्रचारापूर्वीच राजकीय पक्षांकडून आरोप – प्रत्यारोपाच्या फैरीही झाडण्यास सुरुवात झाली आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रभाग रचनेवरून शिवसेनेवर गंभीर आरोप केल्यानंतर आज भाजपनेही याबाबत पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर आरोपांची राळ उठवली. कल्याण डोंबिवली महापालिकेची झालेली ही प्रभाग रचना प्रशासनाला हाताशी धरून करण्यात आली आहे. आपल्याच पक्षाचे अधिकाधिक नगरसेवक कसे निवडून येतील याचा केविलवाणा प्रयत्न शिवसेनेच्या नेत्यांनी केल्याचा आरोप आमदार रविंद्र चव्हाण यांनी केला.
तर या प्रभाग रचनेमूळे भाजपला असुरक्षित वाटण्याचा कोणताच प्रश्न नाहीये. भाजप हा देशातील सर्वात मोठा आणि पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे. आणि केडीएमसी निवडणुकीतही भाजप आपले अव्वल स्थान कायम राखेल असा विश्वास आमदार चव्हाण यांनी व्यक्त केला.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा शिवसेनेला विसर…
भाजपसोबत सत्तेमध्ये असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र महाविकास आघाडीसोबत सध्या सत्तेमध्ये असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी नाराज होऊ नये शिवसेनेला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आता सोयीस्कररित्या विसर पडल्याचा आरोपही आमदार चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला. इतकेच नव्हे तर डोंबिवलीतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाचा प्रभागही आताच्या रचनेतून शिवसेनेने गायब केल्याचे सांगत शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर पडल्याची टिकाही आमदार रविंद्र चव्हाण यांनी यावेळी केली.
या पत्रकार परिषदेला भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, भाजप महिला जिल्हाध्यक्ष रेखा चौधरी, मंदार हळबे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.